लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : मतदान प्रक्रियेत महिला आणि पुरुषांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी मतदार नोंदणी करुन मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोमवारी जागतिक महिला दिनानिमित्त मतदार नोंदणी कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा सत्कार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार आशा होळकर आदी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाचा मतदान प्रक्रियेत महिलांचा मोठा सहभाग रहावा यावर भर राहिला आहे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी मतदार नोंदणी कामात चांगले काम केले आहे. त्यांचे अभिनंदन करुन प्रत्येकाला मतदानाचा स्वतंत्र अधिकार दिला आहे . मतदार नोंदणी करताना मतदानाचे महत्त्वही पटवून सांगावे, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जागतिक महिला दिनाच्या महिलांना शेवटी शुभेच्छा दिल्या.
महिला व पुरुष असा भेद न करता प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. महिला मतदारांनी मतदान नोंदणी करुन मतदान करणे महत्त्वाचे असून वर्षातून १ मतदार यादी प्रसिद्ध होते. या मतदार यादीत आपली नावे आहेत का याची खात्री करावी. लोकशाहीचा आत्मा हा मतदार असून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे प्रास्ताविकात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सांगितले.
या कार्यक्रमास महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
फोटो ओळ : सातारा जिल्हा नियोजन भवनामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.