म्हसवड : ‘म्हसवड येथील माणदेशी फाैंडेशन व बेल एअर हॉस्पिटल, पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलासांठी मोफत कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले आहे. हे शिबिर ७ ते १० जुलै या कालावधीत होणार आहे. या लसीकरणाचा फायदा घ्यावा,’ असे आवाहन माणदेशी फाैंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी केले आहे.
सिन्हा म्हणाल्या, ‘कोरोना काळात अनेक कुटुंब उदध्वस्त झाली आहेत. अनेकांनी प्राणही गमावले असताना, सामाजिक जाणिवेतून खारीचा वाटा म्हणून माणदेशी संस्थेने गोंदवले बुद्रुक येथे माण तालुक्यात पहिले सुसज्ज कोरोना हॉस्पिटल उभारले. त्याचा बहुसंख्य रुग्णांना फायदा झाला. शासनस्तरावर लसीकरण सुरू असून, त्यामध्ये शासनाला मदत व्हावी, या हेतूने ही लस दिली जाणार आहे. अपुऱ्या लस उपलब्ध होत असल्याने महिलांना ताटकळत बसावे लागते. त्यामुळे माणदेशी फाैंडेशनच्या चेतना सिन्हा यांनी महिलांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्याचे ठरविले आहे. यासाठी बेल-एअर हॉस्पिटल, पाचगणी यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. ज्या महिलांनी अद्याप पहिली लस घेतली नसेल त्यांनी आपले नाव नोंदणी वनिता पिसे, योगिता झिमल, शाहीन मुलाणी, लता जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
चौकट -
दररोज साडेसातशे महिलांना लस
लसीकरणासाठी गर्दी होऊ नये व लस सर्वांनाच मिळावी याकरिता दररोज फक्त साडेसातशे महिलांना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी माणदेशी फाउंडेशनने प्रत्येकाला वेळ व वार ठरवून दिलेला आहे. एकावेळी चार टेबल लसीसाठी तयार ठेवण्यात येणार आहेत.
फोटो : चेतना सिन्हा