खंडाळा : खंडाळा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. अनेक गावांत सरपंचपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या पदरी निराशाच आली. त्यामुळे ‘कही खुशी, कही कही गम’ अशीच स्थिती झाली आहे.
आरक्षण सोडत प्रक्रिया खंडाळा येथील किसन वीर सभागृहात शुक्रवारी सकाळी ११ वाजता चिठ्ठीद्वारे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी संजय आसवले, तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले, नायब तहसीलदार वैभव पवार उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या, मात्र ६३ ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षणे जाहीर करण्यात आली. निवडणुका झाल्यापासून सरपंच आरक्षण आपल्यासारखे व्हावे यासाठी अनेक इच्छुकांनी देव पाण्यात घालून ठेवले होते. परंतु आरक्षण सोडतीत अनेकांचा भ्रमनिरास झाला. तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिरवळचा कारभार चालविण्याची संधी अनुसूचित जातीतील कार्यकर्त्याला मिळणार आहे. विंगमध्ये सर्वजण दावेदार होऊ शकतात. पळशी, अतिट, भादे, पाडळी, नायगाव, पिंपरे बुद्रूकसह ३२ ठिकाणी महिलाराज येणार आहे.
अनुसूचित जातीसाठी शिरवळ, अहिरे, असवली, तर अनुसूचित जाती स्त्री राखीवसाठी भादवडे, बावकलवाडी, भोळी ही गावे आरक्षित झाली आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी कर्नवडी, अंदोरी, बोरी, सांगवी, बाळूपाटलाचीवाडी, पिसाळवाडी, सुखेड, कवठे, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीवसाठी अजनुज, जवळे, हरळी, पळशी, अतिट, कान्हवडी, घाडगेवाडी, भादे, वडगाव ही गावे आरक्षित झाली आहेत. सर्वसाधारण सरपंचपदासाठी वाठार बुद्रूक, निंबोडी, खेड बुद्रूक, कोपर्डे, तोंडल, गुठाळे, शेडगेवाडी, राजेवाडी, वाघोशी, म्हावशी, लोहोम, विंग, केसुर्डी, मोर्वे, पारगाव, शिवाजीनगर, कण्हेरी, बावडा, वाण्याचीवाडी, गोळेगाव, तर सर्वसाधारण स्त्री राखीवसाठी अंबारवाडी, दापकेघर, शिंदेवाडी, मिरजे, झगलवाडी, पाडळी, भाटघर, नायगाव, मरीआईचीवाडी, शेखमीरेवाडी, घाटदरे, धनगरवाडी, कराडवाडी, धावडवाडी, साळव, पाडेगाव, लिंबाचीवाडी, लोणी, पिंपरे बुद्रूक, देवघर ही गावे आरक्षित झाली आहेत.
सदस्य नसल्याने पेच
भादवडे, बावकलवाडी, भोळी येथे अनुसूचित जाती स्त्री राखीव आरक्षण जाहीर झाले. मात्र या आरक्षणाचे उमेदवारच निवडून आले नसल्याने या गावांना मुख्य कारभारी कसा मिळणार? हा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. मागास प्रवर्ग स्त्री राखीव हे आरक्षण पडले असले तरी या आरक्षणाचे उमेदवारच निवडून आले नसल्याने येथे काही कालावधीसाठी सरपंचपद रिक्तच राहणार आहे. पिसाळवाडी येथे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाले आहे, परंतु येथे या जागा निवडून आलेल्या नाहीत त्यामुळे येथे सरपंचपद रिक्त राहणार आहे.
जवळेत युद्ध हरले तरी चाव्या हाती
जवळे ग्रामपंचायतीसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजय भोसले यांच्या पॅनलला तीनच जागेवर समाधान मानावे लागले होते, मात्र सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीव झाल्याने याच पॅनलचा सरपंच होणार असल्याचे निश्चित झाले त्यामुळे येथे युद्ध हरले तरी तह जिंकला अशी परिस्थिती नियतीने घडवून आणली आहे.
फोटो २९खंडाळा-इलेक्शन
खंडाळा तालुक्यातील जवळे ग्रामपंचायतीची सत्ता जाऊनही सरपंचपदी वर्णी लागणार असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.