कोयनानगर : ‘भावासमान बहिणीस हक्क द्या, कोयना धरणाच्या जमीन संपादनावेळी तयारी केलेल्या रजिस्टरमध्ये आम्हा प्रकल्पग्रस्तांच्या मुलींचा समावेश करा,’ अशा मागण्या करीत गुरुवारी महिलादिनी हजारो कोयनेच्या प्रकल्पग्रस्त महिलांनी येथील महसूल भवनावर धडक मोर्चा काढला. तसेच प्रशासनास बंद पाकिटातून बांगड्याचा आहेर देत निषेध व्यक्त केला.प्रकल्पग्रस्त महिलांनी यावेळी पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. महसूल भवनात हेळवाक मंडलाधिकारी आनंदराव संकपाळ, तलाठी दिलीप कदम, भाग्यवंत कांबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. तसेच प्रकल्पग्रस्त महिलांसमवेत चैतन्य दळवी, संजय लाड, दत्तात्रय देशमुख, संतोष कदम, दाजी पाटील, श्रीपती माने, संभाजी चाळके यांच्यासह हजारो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोयनानगर येथे गेल्या दहा दिवसांपासून प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या अकराव्या दिवशी गुरुवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचे प्रतिनिधित्व प्रकल्पग्रस्त महिलांनी स्वीकारले. तसेच आक्रमक होत येथील महसूल भवनावर मोर्चा काढला.
‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ या घोषणा देत हा प्रकल्पग्रस्त महिलांच्या वतीने कोयनानगर येथील बसस्थानकामार्गे महसूल भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला. निवेदनात महिलांना पुरुषाप्रमाणेच हक्क मिळाले पाहिजेत, संबंधित कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे,’ अशाही मागण्या केल्या. दरम्यान, आंदोलनस्थळी गुरुवारी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी भेट दिली. तसेच पाठिंबा दर्शविला. अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.आंदोलनाचे महिलांनी चालविले व्यासपीठ.कोयनानगर येथे गुरुवारीही अकराव्या दिवशी सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी महिला दिनानिमित्त दिवसभर महिलांनी आंदोलनाचे व्यासपीठ चालविले. भाषणे, गाणी, कविता, ओव्या म्हणून महिलांनी शासनाचा निषेध केला. यावेळी विद्या देशमुख, कविता कदम, सुजाता शेलार, कमल कदम, जयश्री थोरवडे यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या.अकराव्या दिवशीही आंदोलन सुरुचअकराव्या दिवशीही कोयना प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान, गुरुवारी सकाळी काढण्यात आलेला मोर्चा महसूल भवन येथे आला असता त्यावेळी पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले निवेदन घेण्यासाठी पुढे आले. त्यावेळी आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्त महिलांनी बंद पाकिटातून शासनाला बांगड्यांचा आहेर दिला. तसेच निषेध व्यक्त केला.