मेढा : जावळी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपी सागर पार्टे याला कठोर शिक्षा करावी, त्याला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागण्यांसाठी मेढा येथे सोमवारी शेकडो महिलांनी मूक मोर्चा काढला. मोर्चात महिला, महाविद्यालयीन तरुणी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याबाबत माहिती अशी की, जावळी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी सागर किसन पार्टे याला अटक केली असून, तो पोलीस कोठडीत आहे. याबाबत राजकीय व आर्थिक दबाव वाढत असून, पीडित मुलीच्या नातेवाइकांना त्रास दिला जात आहे, असा आरोप करत मेढा येथे सोमवारी महिला, महाविद्यालयीन तरुणींनी मूक मोर्चा काढला. हा मोर्चा जावळी पंचायत समिती कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत गेला.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सागर पार्टे याचे आसनी-केळघर परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू आहे. या माध्यमातून तो पीडित मुलीवर दोन वर्षांपासून अत्याचार करत होता. त्याने तिला फसवून धाब्यावर बोलावले. अश्लील फोटो व चित्रफीत काढून तिला मारहाण केली. फोटो व चित्रफितीच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती. शाळेत असताना शाळेच्या वेळेत तिला धमकावून गाडीतून घेऊन जात होता. याप्रकरणी संबंधित शाळेतील कर्मचाºयांचीही चौकशी करावी.
या प्रकरणात आजवर समाधानकारक कारवाई झालेली असली तरी सागर पार्टेचे नातेवाईक एका नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांच्यासह उच्च न्यायालयाचे वकील, बँकेचे व्हाईस चेअरमन व केळघर येथील काही प्रतिष्ठित नागरिक पैसा व सत्तेच्या जोरावर पीडित मुलीला तिच्या नातेवाइकांना धमकाविण्याचा व हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या कुटुंबातील एका महिलेने आत्महत्येचाही प्रयत्न केला आहे, असाही आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला.खटला जलदगती न्यायालयात चालवामाजी नगराध्यक्ष पी. डी. पार्टे यांनी याबाबत प्रसारमाध्यमात खोटे वृत्त दिल्याने बाललैगिंक कायद्यांतर्गत कलम २३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात यावी, हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, पीडित मुलीच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे व दबाव आणणाºयांना अटक करावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.