वरकुटे-मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे-मलवडीत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) दि. १५ जून ते १५ जुलै या महिन्यात ‘पोषण परसबाग’ हा उपक्रम राबवला जात असून, या उपक्रमांतर्गत येथील महिलांनी जास्वंदी स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत सेंद्रिय पद्धतीने पोषण परसबाग साकारली आहे.
विषमुक्त शेती, रोगमुक्त जीवन या उपक्रमांतर्गत वरकुटेतील महिला बचत गटाच्या प्रेरिका रुपाली आटपाडकर यांच्या शेतात दीड गुंठे क्षेत्रात बचत गटातील महिलांच्या साह्याने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामध्ये मेथी, कोथिंबीर, चाकवत, गवार, भेंडी, कारलं, दोडका आदी वेलवर्गीय पालेभाज्यांंची लागवड करण्यात आली. यावेळी सुरेखा पिसे, संगीता नरळे, सिंधू नरळे, सुनीता आटपाडकर,योगिता पन्हाळे, रुक्मिणी आटपाडकर, आदी महिला उपस्थित होत्या.
गेल्यावर्षापासून ओढवलेल्या कोरोनाच्या संकट काळात ताजा भाजीपाला मिळत नसल्याने जास्तीत जास्त लोकं डाळी आणि कडधान्याकडे वळली आहेत. ग्रामीण भागात ज्यांना शक्य असेल त्यांना आपल्या घराभोवती पाऊण गुंठ्यापासून दीड गुंठ्यापर्यंत अशाप्रकारची सेंद्रिय परसबाग करता येईल. यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नमुन्यातील भाज्यांचे बी-बियाणे पुरवले जाणार आहे. या पोषण परसबागेत सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवला जाणार असून, यामुळे बचत गटातील महिलांना उपजीविकेचे साधनही उपलब्ध होणार आहे. यावेळी वरकुटे-मलवडीत महिलांंकडून ‘उडाण’ या ग्रामसंघाचीही स्थापना करण्यात आली. या संघामार्फत गरीब, विधवा, घटस्फोटित, दुर्धर आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलांना मदत केली जाणार आहे. यासाठी माण तालुका अभियान व्यवस्थापक शंकर नरबट, प्रभाग समन्वयक संदीप नलवडे व अभियान व्यवस्थापक सुनील काळे, प्रकाश ओंबासे यांनी परसबाग संकल्पना राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच विविध उपक्रमासंदर्भात महिलांमध्ये चर्चा घडवून आणली. यावेळी वरकुटेे-मलवडीतील स्वयंसहायता बचत गटातील अध्यक्ष, सचिव तसेच सदस्य महिला उपस्थित होत्या. यावेळी रुपाली आटपाडकर यांनी आभार मानले.
२४वरकुटे मलवडी
फोटो : वरकुटे (ता. माण) येथील रुपाली आटपाडकर यांच्या शेतात पोषण परसबाग उपक्रमाला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.