लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग असून, महिलांनी लस घेतल्याने घराघरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. कोरोनाचे संकट टाळण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना मोफत लस देण्याचे महान कार्य माणदेशी फाउंडेशनने हाती घेतले आहे. याचा लाभ खटाव तालुक्यातील महिला घेत आहेत.
या मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांनीही मोठ्या प्रमाणात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी लसीकरण फत्ते होत असल्याचे सदृश चित्र फाउंडेशनच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. शासनाच्या लसीकरण मोहिमेची गती वाढवण्यासाठी व शासनाला एक प्रकारे मदत म्हणून जबाबदारीची जाणीव ओळखून खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिलांना मोफत लस मिळवून देण्याचे काम माणदेशी फाउंडेशन प्रामाणिकपणे पार पाडत आहे.
माणदेशी फाउंडेशन व बेल-एअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत कोरोना लसीकरण मोहीम वडूज येथे सुरू आहे. ही मोहीम सलग तीन दिवस सुरू आहे. सुमारे साडेतीन हजार महिलांचा पहिला डोस शिबिर व्यवस्थित पार पाडण्यासाठी माणदेशी फाउंडेशनच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंबर कसली आहे. यावेळी लस घेण्यासाठी आलेल्या प्रत्येक महिलेस वृक्षारोपणासाठी सीताफळाचे रोप मोफतही देण्यात येत आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या महिलांना आरोग्याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, व्यायामांचे विविध प्रकार यांसह रेडिओ माणदेशी एफएमचे कलाकार यांनी विविध गाणी व उखाणे सादर करून महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. यावेळी येणाऱ्या प्रत्येक महिलेला अल्पोपहारही देण्यात आला. शिबिरस्थळी माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा, कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी या स्वतः लक्ष ठेवून उपक्रमातील बारकावे टिपत लसीकरणासाठी येणाऱ्या महिलांची विचारपूसही करत होत्या.
चौकट :
पन्नासहून अधिक महिलांसाठी बसची सोय
ज्या खेडे गावात पन्नासहून अधिक महिला असतील त्यांच्यासाठी माणदेशी फाउंडेशनतर्फे तीन स्वतंत्र लसीकरण बस उपलब्ध केल्याची माहिती शाखाप्रमुख स्मिता टकले यांनी दिली.
चौकट
माणदेशी सेल्फी पाॅइंटला महिलांची पसंती...
खटाव तालुक्यातील खेड्यापाड्यातील लसीकरणासाठी आलेल्या महिलांत उपक्रमादरम्यान उत्साह मोठा होता. या मोहिमेतील प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परत जाताना माणदेशी फाउंडेशनच्या ‘आम्ही लस घेतली, तुम्हीसुद्धा घ्या,’ या सेल्फी पाॅइंटला आवर्जून भेट देत या उपक्रमाला दादही देत होत्या.
फोटो : २७वडूज लसीकरण
वडूज येथे लसीकरणानंतर महिलांना माणदेशी फाउंडेशनच्या चेतना सिन्हा, रेखा कुलकर्णी, स्मिता टकले यांनी रोपे दिली.