सातारा : स्त्रियांची सुरक्षा हा प्रश्न अधिक व्यापक बनला आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचे धाडस महिलांमध्ये वाढले आहे. दलित महिला विकास मंडळाच्या कायदा सल्ला व सहाय्य केंद्राने २०१५ चा वार्षिक अहवाल सादर केला असून, त्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या ३२० तक्रारींपैकी २५० तक्रारी तडजोडीने सोडविण्यात यश आल्याची माहिती केंद्राच्या अॅड. वर्षा देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.अॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेत केंद्राकडे यंदा ११३ अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. याचा अर्थ अन्यायामध्ये वाढ झाली आहे आणि तक्रार दाखल करण्याबाबतची महिलांमध्ये जाणीवजागृती निर्माण झाली आहे. २०१५ चा अहवाल सादर करताना सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील स्त्रियांनी स्त्री सक्षमीकरणाच्या दिशेने धाडसाचे पाऊल टाकले आहे, असे वाटते. ’गर्भाशयापासून थडग्यापर्यंत महिला सुरक्षित हव्यात, यासाठी साताऱ्यात फॅमिली कोर्ट आणि महिलांसाठी निवास व्यवस्था असणे गरजेचे आहे. तसेच शासकीय रुग्णालयात व्यसनमुक्तीचा वॉर्ड असायला हवा, असेही त्या म्हणाल्या. जात-जमात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या सहा तक्रारी केंद्राच्या वतीने हाताळल्या, त्यातील चार आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्ने संस्थेच्या पुढाकाराने लावण्यात आल्याचे अॅड. देशपांडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)१८ डॉक्टरांना शिक्षा गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आतापर्यंत ४२ पेक्षा जास्त डेकॉय आॅपरेशन केली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत एकूण १८ प्रकरणांत डॉक्टरांना शिक्षा लागली आहे, अशी माहितीही यावेळी अॅड. वर्षा देशपांडे यांनी दिली.
हिंसामुक्त कुटुंबाच्या दिशेने महिलांचे पाऊल : देशपांडे
By admin | Published: February 11, 2015 10:05 PM