प्रगती जाधव-पाटील । सातारा : जागतिकीकरणाच्या युगात माहितीचा विस्फोट होत असताना महिलांना मात्र त्यांच्या जगण्याशी निगडीत असलेल्या कायदा अद्यापही त्यांच्या भाषेत उपलब्ध होत नाही. महिलांच्या जगण्यासाठी आवश्यक असलेले कायदे, पुस्तके, माहितीपट यासह अनेक गोष्टीं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विकिपिडीयावर अपलोड करण्याचा अनोखा उपक्रम लेक लाडकी अभियानाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. जगभरातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्या युगात अद्यापही महिलांना त्यांच्या नियमित आयुष्यातील महत्त्वपूर्ण बाबी कोणाकडून तरी समजून घेण्याची वेळ येते. महिलांविषयक कायदा चांगला आहे. पण तो मराठीत नसल्यामुळे त्याच्याविषयीची माहितीही महिलांपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महिलांचा उत्सव साजरा करताना त्यांच्या सक्षमीकरणाचे आणि भाषेच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने हा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जगभरातील माहिती मुक्तपणे वाचनाची सोय उपलब्ध असलेल्या विकिपिडीयावर कोणीही मुक्तपणे आपल्या भाषेविषयीची माहिती अपलोड करू शकते; पण याविषयी अजूनही व्यापक प्रमाणात प्रसिद्धी न मिळाल्याने महिलांविषयीची अपेक्षित अशी माहिती येथे नव्हती. महिलांविषयक कायदे, स्टिंग आॅपरेशनचे पुस्तक, कौटुंबिक हिंसाचार कायदा, कर्तृत्ववान महिलांच्या यशोगाथा यासह मराठीतून अनेक कायद्यांची माहिती भरण्यात येणार आहे. या माहितीमुळे महिलांना त्यांच्या हक्कांच्या जाणीवांची माहिती होऊन त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकले जाईल. या उपक्रमात लेक लाडकी अभियानच्या अॅड. वर्षा देशपांडे यांच्यासह अॅड. शैला जाधव, ओवी कुलकर्णी, दीपेंती चिकणे, माया पवार, कैलास जाधव, रुपा मुळ्ये, सुश्मिता मुळ्ये, प्रा. संजीव बोंडे, अॅड. चैत्रा व्ही. एस. यांची टीम यासाठी प्रयत्न करणार आहे. माहिती असणं हेच सक्षमीकरण होय...! ज्ञानाची मक्तेदारी एका विशिष्ट वर्गाकडे ठेवण्याची प्रथा मोडीत काढण्याचा हा प्रयत्न आहे. जिथं महिलांना मोफत ज्ञान मिळू शकतं अशा ठिकाणी त्यांना माहितीच उपलब्ध होत नाही, हे समोर आलंय. बदलत्या काळात माहिती असणं हेच सक्षमीकरण ठरू पाहत आहे. अशा स्थितीत महिलांना मुबलक माहिती देणं आणि त्यांना अधिकारांच्या जाणिवांनी साक्षर करणं अधिक महत्त्वाचं ठरू पाहत आहे.
स्त्रियांचं विश्व विकिपिडीयावर! कायदे, पुस्तके, माहितीपटासह सबकुछ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 6:38 PM