ढासळलेल्या कड्याखाली आख्खं माळीण गाव गडप झालं, त्याला वर्ष झालं. डोंगरकुशीत वसलेली जिल्ह््यातली असंख्य गावं मात्र अजून भेदरलेली... पावसाचा जोर वाढला, तर रात्र जागून काढणारी. प्रश्न इतकाच की, धोका ओळखून झटपट उपाय योजणार की पुन्हा एखादी ‘माळीण’ होण्याची वाट पाहणार? दत्ता यादव - सातारातीस वर्षांपूर्वी गावात ‘माळीण’पेक्षा भयानक दुर्घटना घडली होती. दोन्ही बाजूंकडून चिखलाचे लोट दारात पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे शेत कुठे आहे, हे शोधावे लागले होते. या दुर्घटनेची नव्या पिढीला माहिती नसली तरी माळीण गावच्या दुर्घटनेमुळे गावे कशी मातीखाली गाडली जातात, हे समजलं. त्या दिवसांपासून अशा वेळी तिसऱ्या भोंग्याची धोक्याची सूचना गावकऱ्यांना दिली जाऊ लागली.आत्तापर्यंत गावात कोणाचा मृत्यू झाल्यास किंवा बैठक बोलवायची असेल तर गावच्या मध्यभागी असणारा भोंगा वाजवावा लागत होता. परंतु माळीण दुर्घटनेसारखी परिस्थिती उद्भविल्यास आता तिसरा भोंगा तोही जोराने वाजविल्यास नागरिकांनी तत्काळ घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छताडावर डोंगर घेऊन आम्ही रोज जीवन कंठत असताना आमची आम्हाला सुरक्षा करावी लागत आहे. प्रशासनाने पाठ फिरवल्यामुळे आम्हीच आमचा पर्याय शोधून काढला असल्याची हतबल प्रतिक्रिया रुईघर येथील अनेक ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.वार्ध्यक्याकडे झुकलेले बबन जांभळे सांगत होते. ‘माळीण दुर्घटना झाल्यानंतर आमचं गाव रात्रभर झोपलं नाही. दोन्ही डोंगरांच्या कुशीत आमचे गाव वसले आहे. त्यामुळे छताडावरचा डोंगर कधी कोसळेल, हे सांगता येणार नाही. माळीण दुर्घटनेनंतर पुढाऱ्यांनी केवळ गावची पाहणी केली; परंतु एका वर्षानंतरही गावच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही. प्रशासनाने लक्ष न घातल्याने आम्हीच आमचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यंदा पाऊस कमी असल्यामुळे फारसा धोका वाटत नाही. तरीसुद्धा गाफील न राहता आम्ही भोंग्याचा आसरा घेतला आहे. गावातील भोंगा वाजल्यानंतर आम्ही धावतच घराबाहेर पडतो. कुणीतरी झोपेतून उठवायला आहे, म्हणून झोप लागते; अन्यथा भोंगा नसता तर आमचा कधी वारुळ होईल, हे सांगता येणार नाही,’ असेही निराश होत जांभळे यांनी आपल्या मनातील खदखद बाहेर काढली.‘तासभर पाऊस पडला की मन कासावीस होते. वारा-पावसाने जमीन हादरल्यासारखी वाटते. काहीजण झोपेतून उठून आजही शिवाजी चौकात जमा होतात. कधीकधी असं वाटतं माळीणसारखं झालं तर आमचं काय होईल, या विचारानेच आम्ही कासावीस होतो...’ भावनाविवश होऊन संतोष बेलोशे सांगत होते.भेकवलीची परीक्षा पाहतंय ‘सरकतं रान’राजीव मुळ्ये -सातारापुणे जिल्ह्यातलं माळीण गाव कड्याच्या मातीखाली गाडलं गेलं, त्याच्या सहाच दिवस आधी कड्यावरच्या भेकवली गावानं ‘सरकतं रान’ पाहिलं. महाबळेश्वर तालुक्यातल्या या गावात आजही पाऊस वाढला की घाबरगुंडी उडते. वर्ष सरलं. यंत्रणाही हलली; पण यंत्रणेचा वेग निसर्गाच्या अक्राळविक्राळ जबड्यातून गावाला ओढून काढू शकेल का, हा प्रश्न आजही आ वासून उभा आहे. गच्च वनश्रीनं वेढलेल्या भेकवली गावातली रानं आणि घरं अचानक पाच फुटांपेक्षाही जास्त पुढं सरकली... दरीच्या दिशेनं. गावातल्या रस्त्यासह अनेक ठिकाणी कड्याला समांतर अशा जमिनीला पडलेल्या लांबलचक भेगा पाहायला मिळतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. कड्यापासून सुमारे शंभर मीटरचा परिसर आरत चालला आहे. जमिनीला पडलेल्या भेगेपासून कड्याकडच्या बाजूची पातळी अलीकडच्या बाजूपेक्षा खाली गेलेली स्पष्ट दिसते. कडा पुढे-पुढे सरकतो आहे. या कड्यावर भातलागण करताना ग्रामस्थांची मन:स्थिती काय असेल, हे वेगळं सांगायची गरज नाही. माळीण दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील अनेक धोकादायक गावं शोधून काढली; त्यातलं भेकवली हे प्रमुख गाव. कड्याजवळ पडलेल्या भेगा आता काही ठिकाणी मातीनं भरल्यात... आपोआप! पण हा वरवरचा ‘मेकअप’ आहे हे डोंगरी ग्रामस्थांना सांगावं लागत नाही. पाऊस वाढेल तशी त्यांच्या चेहऱ्यावरची काळजीची रेषा गडद होताना दिसते. भेकवली गावातील किसन काशिनाथ केळगणे, आत्माराम जावजी केळगणे, शांताराम जावजी केळगणे आणि सखाराम जावजी केळगणे यांची कुटुंबं कडा सरकण्याच्या घटनेत पूर्णत: बाधित झाली आहेत. शंकर बाबू केळगणे, संजय यशवंत केळगणे, गोविंद लक्ष्मण केळगणे, दिवजी गणपत खामकर, तुळशीदास आनंदा केळगणे आणि रवींद्र दत्तात्रय केळगणे यांची कुटुंबं अंशत: बाधित आहेत. पूर्णत: बाधित घरांमध्ये एक नवीन बांधकामही आहे. त्याचे आडवे ‘बीम’ चक्क वाकून पाच फूट पुढं झुकलेत. कडा जिथे सुटला आहे, तिथूनच गावातला एकमेव रस्ता जातो. रस्त्याला पडलेले तडे स्पष्ट दिसतात. अशाच तड्यांचे तीन-चार समांतर पट्टे गावातून जातात. प्रत्यक्षदर्शी या गावाचं वर्णन ‘अत्यंत धोकादायक’ असंच करतील.बाधित कुटुंबांना भरपाईची पूर्ण रक्कम लवकरात लवकर मिळणं गरजेचं आहे. त्याखेरीज पर्यायी जागेतही ते घर बांधू शकत नाही. गेल्या वर्षी संपूर्ण गावानं भीतीपोटी देवळात जमून रात्री जागून काढल्या आहेत. आताही पावसाचा जोर वाढला की कुणी झोपत नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्यानं गावाचा धोका कमी करण्याच्या उपाययोजना केल्या नाहीत, तर ग्रामस्थ पावसाळ्यात असेच भीतीच्या छायेखाली राहणार.- सीताराम मारुती केळगणे, सरपंच (भेकवली)काय घडलं वर्षभरात... कड्याजवळ तडे गेल्यानंतर पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे आणि तिथून ‘हुडको’कडे प्रत्येकी सहा लाखांच्या भरपाईचे प्रस्ताव पाठविले.काय घडायला हवं...बाधित कुटुंबांना पर्यायी जागा मिळणं ही गावकऱ्यांची पहिली गरज आणि मागणी आहे. परिसरात अन्यत्र ज्यांच्या जमिनी आहेत, त्यांना ‘सरकणारं रान’ सोडून स्थलांतरित होता येईल; पण अशी कुटुंबं कमी आहेत. वन विभागाकडून पर्यायी जागेसाठी प्रस्ताव पाठवायचा झाल्यास ‘भेकवली ते भोपाळ’ असा मोठ्ठा प्रवास फायलीला करावा लागेल. त्यात किती वेळ जाईल, हे सांगता येत नाही. पर्यायी जागांपेक्षाही महत्त्वाचा प्रश्न गावाच्या सध्याच्या सुरक्षिततेचा आहे. तज्ज्ञांच्या पथकाने तातडीनं भूगर्भशास्त्रीय अहवाल तयार करून धोक्याची तीव्रता ठरवणं अत्यावश्यक बनलंय.
वा च वा!--वारुळ होईल! भोंगा नसेल तर आमचं
By admin | Published: July 29, 2015 11:21 PM