पुसेसावळी : मुलांचे आरोग्य जपण्यासाठी पोषण आहाराबरोबर अंगणवाडीची स्वच्छता तसेच आहारातील घटक या बाबीही महत्त्वाच्या आहेत. अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे कार्यही लाखमोलाचे असून, प्रत्येक घराघरात पोहोचून सेवा पुरविण्याचे मोलाचे काम त्या करीत आहेत,’ असे मत पुसेसावळीचे सरपंच दत्तात्रय रुद्रुके यांनी व्यक्त केले.
पुसेसावळी (ता. खटाव) येथे राष्ट्रीय पोषण अभियानअंतर्गत पोषण आहाराचा शुभारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपसरपंच डाॅ. विजय कदम, सोसायटी संचालक उदय माळवे, मुख्याध्यापिका योजना घार्गे, पर्यवेक्षिका काजल कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची जनजागृती महत्त्वाची असून त्याचा फायदा गावातील गरोदर महिला, किशोरवयीन मुली, लहान मुले यांना नक्की होईल. महिनाभर चलणाऱ्या या कार्यक्रमास ग्रामपंचायतीकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. असे आश्वासन सरपंच रुद्रुके यांनी दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशासेविका आदींसह महिला उपस्थित होत्या. पद्मिनी सासणे यांनी आभार मानले.