वाठार स्टेशन : ‘गतवर्षी जिल्ह्यात कोरोना रोखण्यात कोरेगाव तालुक्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र चालूवर्षी गावपातळीवर जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार नेमलेल्या ग्रामस्तरीय कमिट्या या कामात सक्रिय राहिल्या नसल्याने कोरेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी खंत कोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुंखे यांनी व्यक्त केली.
राज्यभर कोरोना महामारीचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. गावच्या गाव एकाचवेळी बाधित होत आहेत. यासाठी सरकार सर्वतोपरी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत असूनही रुग्ण संख्या घटत नसल्याने सध्या राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. शहराबरोबरीने गावातही दररोज रुग्ण वाढत आहेत. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्यांची गावागावात ग्रामस्तरीय कमिटी नेमण्यात आली आहे. या कमिट्यांना याबाबतीत अधिकार दिले आहेत. मात्र जे काम गतवर्षी या समितीने केले ते चालूवर्षी दिसून येत नसल्याने कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.
अनेक गावात याबाबत चांगले काम दिसत असलेतरी गेल्यावर्षी ज्या गावांनी अनेक दिवस कोरोना वेशीवरच रोखला, या गावात चालूवर्षी कोरोना बाधित रुग्ण वाढ झालेली दिसत आहे. याबाबत ग्रामस्तरीय समित्यांना प्रशासनाने योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.