सह्याद्री सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व जमीन बागायत होण्यासाठी दिवंगत पी. डी. पाटील यांनी प्रयत्न केले. कृष्णा व कोयना नदीकाठी पाणीपुरवठा संस्था त्यांनी स्थापना केल्या. त्या माध्यमातून हजारो एकर जमीन बागायत झाली. कृष्णा नदीच्या पूर्वबाजूचे क्षेत्र आरफळ व धोम डाव्या कालव्याद्वारे बागायत झाले आहे. तथापि आरफळ डाव्या कालव्याच्या पूर्वेकडील भाग वंचित राहिल्यामुळे या भागाला वरदान ठरणाºया हणबरवाडी-शहापूर व धनगरवाडी-बानूगडेवाडी उपसा जलसिंचन योजनांसाठी आरफळ कालव्यातून पाणी उपसा करणे गरजेचे होते. या दोन उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी पी. डी. पाटील यांनी तत्कालिन सरकारकडे प्रयत्न केले. त्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांनी या योजनांना निधी उपलब्ध होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि निधी उपलब्ध झाला.
दोन्ही योजनांच्या कामाला सुरुवातही झाली. मात्र, दरम्यानच्या काळात या योजनांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसल्याने काम रखडले. सध्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाल्यानंतर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिला असल्याने, या योजनांचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आलेले आहे.