कागल : पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या शेतकरी, महिला, युवकांसाठी अनेक योजना आहेत. मात्र, कागल तालुक्यात या योजना लाभार्थ्यांच्याऐवजी दुसरीकडेच गेल्या आहेत. ५० टक्के दराने शेती औजारे देण्याच्या योजनेत ‘मलई’ खाण्याचेच काम आजवर होत आले आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे युवा नेते समरजितसिंह घाटगे यांनी करनूर (ता. कागल) येथील प्रचारसभेत केली. या सभेत भारत पाटील, विजय जाधव, जयसिंग कांबळे, डॉ. तेजपाल शहा, ‘शाहू’चे संचालक बॉबी माने, टी. ए. कांबळे, विक्रमसिंह घाटगे, अॅड. बाबासो मगदूम, तानाजी लोकरे, आनंदा पाटील, विमल चौगुले, कृष्णात धनगर, सुनील गुदले, आदी मान्यवर उपस्थित होते. समरजितसिंह घाटगे म्हणाले, एकीकडे ३५ वर्षे पंचायत समिती, दुसरीकडे २० वर्षे आमदारकीची सत्ता असताना विकासावर बोलायला ही मंडळी का तयार नाहीत. मी सकारात्मक व विकासाच्या मुद्द्यावर बोलताना यांना राग का येत आहे? विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून ते खालच्या पातळीवर येऊन टीका करीत आहेत. कागल तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. भाजपच यापुढे सर्वत्र दिसणार आहे. शाहू पॅटर्नप्रमाणे पंचायत समितीत सत्ता राबवू, पंचायत समितीत काय केले, हे जर सांगता येत नसेल, तर पाच वर्षे काय करणार हे तरी सांगा, असे आवाहनही केले. स्वागत, प्रास्ताविक जयसिंग कांबळे यांनी, तर आभार विजय चौगुले यांनी मानले.
तालुक्यात ‘मलई’ खाण्याचेच काम
By admin | Published: February 05, 2017 12:43 AM