सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. याची झळ आता रिक्षाचालकांना देखील बसू लागली आहे. महागाईबरोबरच इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने रिक्षाचालकांना जोड व्यवसाय करून कुटुंबाची गाडी चालवावी लागत आहे.
सातारा जिल्ह्यातील रिक्षाचालकांची संख्या सात हजारांच्या घरात आहे. बहुतांश रिक्षाचालकांचे रिक्षा हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षा व्यवसाय प्रतिष्ठेचा मानला जात होता. त्यातून उत्पन्नही चांगले मिळत होते. मात्र, स्पर्धा वाढल्याने हळू-हळू रिक्षा व्यवसाय अडचणीत आला अन् अनेकांनी रिक्षा ऐवजी नोकरी व व्यवसाय सुरू केला. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये हा रिक्षा व्यवसाय पूर्णत: डबघाईला आहे. सात ते आठ महिने रिक्षा बंद असल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला.
अनेक रिक्षाचालकांनी बॅँका, पतसंस्थांकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्या. कर्जाचे हप्ते वेळेत अदा न झाल्याने अनेकांना रिक्षा विकावी लागली. पूर्वीप्रमाणे उत्पन्न मिळत नसल्याने आता अनेकांनी जोड व्यवसाय सुरू केला आहे. कोणी हॉटेलमध्ये नोकरी करत आहे. कोणी दूध विक्री तर कोणी भाजी विक्रीचा व्यवसाय सांभाळून रात्रीच्या वेळी रिक्षा चालवत आहेत. काहीजण दिवसभर मिळेल ते काम करून त्यानंतर रिक्षा चालवत आहेत. एकूणच रिक्षाचालकांची अवस्था कोरोनानंतर अधिकच बिकट झाली आहे.
(चौकट)
दरवाढीचा परिणाम
गेल्या तीन-चार महिन्यांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. त्यात प्रवाशांच्या क्षमतेवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढीव भाडे देण्यास ग्राहक तयार होत नाहीत. त्यामुळे अनेकांनी रिक्षा चालविणेच बंद केले आहे.
(चौकट)
पैसा उरत नसल्याने करावे लागते इतर काम
रिक्षा व्यवसाय पूर्वीसारखा राहिला नाही. पूर्वी खर्चवजा करता तीनशे ते चारशे रुपयांचा नफा मिळत होता. आता तो शंभर-दोनशे रुपयांवर आला आहे. एवढ्या पैशांंत घरखर्च चालविणे जिकीरीचे बनत असल्याने रिक्षाचालकांना मिळेत ते काम करून कुटुंब चालवावे लागत आहे.
(चौकट)
जिल्ह्यातील एकूण रिक्षा
पेट्रोल रिक्षा ४५००
डिझेल रिक्षा २५
एलपीजी रिक्षा २४००
(चौकट)
पेट्रोल-डिझेलचे दर (प्रति लिटर)
डिसेंबर - पेट्रोल ९०.९७
डिझेल ७९.९१
जानेवारी - पेट्रोल ९१.९४
डिझेल ८०.९७
फेब्रुवारी - पेट्रोल ९५.९७
डिझेल ८५.५२
(कोट)
कोरोनामुळे रिक्षाचालकांना मोठा आर्थिक फटका बसला. सलग आठ महिने व्यवसाय बंद असल्याने आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर बनला. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर दिलासा मिळेल असे वाटत असताना इंंधनाचे दर वाढल्याने व्यवसायावर परिणाम झाला. उत्पन्न मिळत नसल्याने मी हॉटेलमध्ये काम करून वेळेनुसार रिक्षा चालवितो.
- मुश्ताक शेख, रिक्षाचालक
(कोट)
महामागाईची झळ सर्वसामान्यांना सोसावी लागत आहे. रिक्षा व्यवसायिकांची देखील यातून सुटका झालेली नाही. पेट्रोल, डिझेलचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रिक्षाने प्रवास करणाऱ्यांची संंख्याही कमी झाली आहे. मी आता आचारी म्हणून काम करत आहे. जेव्हा जेवण बनविण्याचे काम नसते तेव्हाच रिक्षा चालवितो.
- नजीर बागवान, रिक्षाचालक
(कोट)
लॉकडाऊनच्या कालावधीत रिक्षाचालकांचे प्रचंड नुकसान झाले. कुटुंबांचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी आम्हाला मिळेल ते काम करावे लागले. महागाई व इंधन दरवाढीचा फटका सातत्याने या व्यवसायाला बसत आहे. आम्हाला रिक्षावर घरखर्च चालविणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे वेळोवेळी मिळेल ते काम आम्ही करतो.
- अभिजित रणभिसे, शनिवार पेठ
फोटो : १६ रिक्षा ०१/०२
फोटो : १६ मुश्ताक शेख
१६ नजीर बागवान
१६ अभिजित रणभिसे