पाडळी ते खराडे फाटा रस्त्याचे काम दोन ते अडीच वर्षांपूर्वी चालू झाले होते; पण, कामाचा दर्जा व्यवस्थित नसल्याने पाडळीच्या ग्रामस्थांनी दोनवेळा काम बंद पाडले. त्यानंतर कोरोनाचा काळ चालू झाला. त्यामुळे काम बंद करावे लागले. काही दिवसांपूर्वी पुन्हा रस्त्याकडेला खडी टाकायला सुरुवात झाली. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू होण्याची आशा पल्लवित झाली. बांधकाम विभागाने ते सुरूही केले. मात्र, फक्त २०० मीटर अंतरापर्यंतचे खडीकरणाचे काम पूर्ण करून गत १५ दिवसांपासून हे काम बंद करण्यात आले आहे.
कऱ्हाड व कोरेगाव या दोन तालुक्यांना जोडणारा याशिवाय अनेक मोठ्या बाजारपेठा असलेल्या गावांना जोडणारा हा मार्ग असल्याने या रस्त्याला दळणवळणाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. याखेरीज गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली होती. दरवर्षी प्रशासन खड्डे बुजविण्याचे काम हाती घेत होते. या मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे हा रस्ता मजबूत होणे गरजेचे आहे. या मार्गावरून साधारण प्रत्येक तासाला बसची एक फेरी चालू आहे. रस्ता खराब झाल्याने अपघात घडू लागले आहेत.
- चौकट
ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये संभ्रम
गत दोन-अडीच वर्षांपासून रखडलेले या रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाले होते. मात्र, दोनशे मीटरचे खडीकरण पूर्ण केल्यावर हे काम कोणत्या कारणासाठी बंद आहे, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. नक्की काम कोणी बंद पाडले? आणखी काही अडचण आहे का? याबाबत परिसरात ग्रामस्थांसह प्रवाशांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.
- चौकट
वाहतुकीला अडचण... अपघाताला निमंत्रण!
रखडलेले काम पुन्हा सुरू झाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा खडीचे ढिगारे टाकण्यात आले आहेत. मात्र, पुन्हा काम बंद पडल्याने रस्त्याच्या दुतर्फा पडलेले खडीचे ढिगारे वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत. त्यामुळे किरकोळ अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहेत.
फोटो : १०केआरडी०३
कॅप्शन : कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव ते खराडे फाटा रस्त्याचे काम पुन्हा रखडले असून, रस्त्याकडेला टाकलेली खडी अपघाताला निमंत्रण देत आहे.