पश्चिम महाराष्ट्रात पुणे-मुंबईबरोबर जवळचे कनेक्शन असल्याने सातारा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. रोज हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरापासून वाढता वाढता वाढे अशीच कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या या दिवसांत लोकप्रतिनिधींनी ॲक्टिव्ह मोडमध्ये राहणं अपेक्षित असताना भीषण औषधांची टंचाई भासत असतानाही हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बसणारे लोकप्रतिनिधी सातारकरांनी पाहिले. जिल्ह्यातील प्रत्येक लोकप्रतिनिधीचे त्यांच्या भागात स्वत:चे वलय आहे. त्यामुळे आमदारांनी एखादी गोष्ट सांगितली तर ती करण्याकडे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांचा कल असतो. नेमकं याचाच लाभ घेऊन नागरिक घराबाहेर पडणार नाहीत, यात्रा-जत्रांवर नियंत्रण आणून कोविडला अटकाव करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं अपेक्षित असताना यात्रांना परवानगी द्या म्हणून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव टाकणारे आणि शासनाने दंड केला तर त्याची रक्कम भरणारे महान लोकप्रतिनिधी सातारकरांनी अनुभवले. मतांच्या राजकारणापायी शंभराहून अधिक रुग्णांची भर पाडून परवानगी मागणारे आणि दंड भरणारे या दोघांनीही कलटी मारली, पण यात्रेत सहभागी झालेल्यांना कोविडने घेरले. त्यांच्यासाठी बेडसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मात्र या दोघांचाही उपयोग झाला नाही.
गतवर्षी कोविडची भीषणता लक्षात घेऊन साताऱ्यात संग्राम बर्गे, सादिक शेख आणि विनीत पाटील यांच्या संकल्पनेतून सातारा कोविड डिफेंडर ग्रुपची स्थापना झाली. या ग्रुपने लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्न पुरविण्यापासून गावी सोडण्यापर्यंतची भूमिका पार पाडली. राजकारणविरहित असलेला हा ग्रुप वर्षभर कोरोना रुग्णांसाठी प्रयत्नशील आहे. रात्री बारा आणि एक वाजता रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी ग्रुपचे सदस्य धडपडतात. रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळवून देण्यासाठी ग्रुपच्या सदस्यांनी आग्रही भूमिका मांडून प्रशासनाचे वाभाडेही काढले. कोणतीही सत्ता आणि पद नसताना सामान्यांनी सामान्यांसाठी तयार केलेला हा ग्रुप जर काम करू शकतो, तर वर्षांनुवर्षे लोकांनी निवडून दिल्याने सत्ता उपभोगणाऱ्यांना कठीण काळात बाहेर पडून काम करा, असं सांगायची वेळ येणं हेच दुर्दैवी आहे.
बंगल्यातून बाहेर ऑनग्राऊंड कामासाठी येण्याची गरज
कोरेगाव मतदारसंघातील गावात एकंबे गावात कोरोनाचा स्फोट झाल्यानंतर आरोग्य यंत्रणेला न जुमानणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचून आमदार महेश शिंदे यांनी ग्रामस्थांची तपासणी करून त्यांना स्वत: दवाखान्यात दाखल केले. स्वत: दोन वेळा कोरोनाबाधित होऊन मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढले. युद्धजन्य परिस्थिती समजावून घेऊन स्वत: ऑन ग्राऊंड काम करणारे त्यांच्यासारखे लोकप्रतिनिधी अभवानेच दिसत आहेत. गतवर्षी मोठ्या थाटात मतदारांसाठी कोविड हॉस्पिटल सुरू करून त्याच्या उद्घाटनाचा घाट घालणाऱ्या अनेकांनी आता तो विषय टाळला आहे. जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसतना कोणताही लोकप्रतिनिधी त्यावर चकार शब्द न उच्चारणं आणि प्रशासनाला जाब न विचारणं हे सुज्ञ सातारकरांना निश्चितच सललंय. ही सल सातारकर योग्यवेळी काढतील, पण तोवर अनेकांना प्राणांना मुकावं लागेल अशी परिस्थिती दिसते.