सातारा : जिल्हा रुग्णालयात आठ वर्षांच्या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे रविवारी रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, या घटनेचा निषेध म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी काही वेळ ‘काम बंद’ आंदोलन केले. रेणुका जाधव (वय ८, रा. भालेवाडी, ता. कऱ्हाड) या मुलीला उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान तिचा आकस्मिक मृत्यू झाला. तिच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की सुरू केली. दरम्यान, रुग्णालयाचे सुरक्षारक्षक त्या ठिकाणी आले असता, त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ रुग्णालयीन कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी सुमारे एक तास कामकाज रोखून धरले. या काळात कर्मचारी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गोळा झाले होते. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांचे नातेवाईक रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. सकाळची वेळ असल्यामुळे बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची गर्दी होती. मात्र, अनेकांना ताटकळत राहावे लागले. कशामुळे काम बंद आंदोलन सुरू झाले आहे, कोणालाच काही समजायला मार्ग नव्हता. यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल झाले.वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले. दरम्यान, धक्काबुक्कीप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयात ‘काम बंद’ आंदोलन
By admin | Published: December 14, 2015 10:22 PM