सातारा : येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना तीन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे संबंधितांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तसेच आंदोलनकर्ते जिल्हा रुग्णालयासमोर बसले होते.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सांगली सुरक्षा रक्षक मंडळामार्फत १८ सुरक्षा रक्षक जिल्हा रुग्णालयात २०१५ पासून कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना एप्रिल महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. घर भाडे, वीज बिल, किराणा बिल थकले आहे. त्यामुळे संबंधितांकडून पैशांसाठी तगादा लावला जात आहे. तर पगारासाठी जिल्हा रुग्णालय तसेच सांगली सुरक्षा रक्षक मंडळाशीही संपर्क साधला. पण, कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे.
या आंदोलनात पृथ्वीराज गायकवाड, सागर बोबाटे, राजू कांबळे, खंडोबा बुधावले, योगेश लोहार, शशिकांत बडेकर, वसिम मुलाणी, राजेंद्र पाटोळे, संभाजी शिंदे, वैभव जाधव, तानाजी घोरपडे, शिवाजी इंगवले, संदीप काशिद, आनंदा घाडगे, सुरेखा माने, आशा गायकवाड, स्वाती चिंचकर आणि कविता लोखंडे सहभागी झाले आहेत.
फोटो दि.२५सातारा सिव्हिल फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर पगारासाठी सुरक्षा रक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. (छाया : जावेद खान)
............................................................