कऱ्हाड (जि. सातारा) ,दि. ३० : उसाचा पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या तोडीला होत लावू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना देण्यात आला होता. तरीही कारखान्यांच्या टोळ्यांनी ऊसतोड केल्याने याविरोधात सोमवारी दुपारी बारा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्ले येथे सुरू असलेली ऊसतोड फडात जाऊन बंद पाडली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, उपजिल्हाध्यक्ष दादासाहेब यादव, अनिल घराळ, कऱ्हाड तालुकाध्यक्ष प्रमोद जगदाळे, रोहित पाटील, बाळासाहेब पिसाळ, योगेश झांबरे, अमर कदम आदींची उपस्थिती होती.
कऱ्हाड तालुक्यातील गावांत ऊसतोड करण्यासाठी जिल्ह्यासह तालुक्यातील कारखान्यांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही क्षणी ऊसतोड करण्यास सुरुवात केली जाणार आहे. मात्र, ऊसतोड घेण्यापूर्वी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपला उसाचा पहिला हप्ता जाहीर करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती.
मात्र, पहिला हप्ता हा ३४०० रुपये जाहीर न करता कारखान्यांनी ऊसतोड सुरू केली. कऱ्हाड तालुक्यातील पार्ले येथे ऊसतोड टोळ्यांकडून सुरू करण्यात आली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्याना मिळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन तोडी बंद पाडल्या.