सातारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मृत्युसंख्येत दैनंदिन वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची दि. २१ एप्रिल रोजी कार्यशाळा आयोजित करून पुनर्प्रशिक्षण देण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी दिल्या आहेत.
या कार्यशाळेमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांना शासनाच्या रुग्ण हाताळणी, कार्यपध्दती, टेस्टिंग, उपचार, रेफर इ. सर्व बाबतीत शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्याबाबत सखोल मार्गदर्शन करावे. यासाठी या कार्यालयाकडील तसेच शासनाच्या सर्व परिपत्रकांचा वापर करावा. कोविड-१९ बाबत सर्व बाबी ज्ञात कराव्यात.
या प्रशिक्षणास वैद्यकीय व्यावसायिक अनुपस्थित राहिल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंध कायद्यान्वये कारवाई केली जाईल याची समजही देण्यात यावी, असेही जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.