पेट्री : जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश असलेल्या कासच्या शिरपेचात सातारीतुरा उमलला आहे. सातारान्सिस हे फूल मे महिन्यात पहिल्या पावसात दर्शन देऊ लागले आहे. गतवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारीतुऱ्याचे दर्शन झाले होते.सातारीतुरा फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन सातारान्सिस म्हणूनही ओळखले जाते. दुर्मीळ वनस्पतीपैकी मुळाशी कंद असणारे हे भुई ऑर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात, खडकात, मातीचा भाग व त्यामध्ये पाणी साचते अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो. त्यावर येणारे पान हे लांब व जाडसर आकाराचे असते. भाल्यासारखे दिसते.पानामध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असते. दोन ते तीन पानांच्या बेचक्यातून लांब व जाडसर अशा दांड्यात इंग्रजी ‘वाय’ आकाराचा तुरा येतो. म्हणून यास वायतुरा म्हणतात. हे फूल केवळ साताऱ्याच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणीच सड्यावर आढळते. म्हणून यास सातारीतुरा म्हणतात. सातारीतुरा वनस्पती कास पठार व परिसरातील जैवविविधतेचे भूषण ओळखले जाते. शनिवार, रविवार सुटीत कास तलाव परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतानाचे चित्र आहे. दरम्यान सातारीतुरा वनस्पतीचे दर्शनाने आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
कास पठाराचे वैशिष्ट्यजून ते ऑक्टोबर महिन्यांदरम्यान तृण, कंद, वेली, तसेच वृक्ष, झुडपे, आर्किड, डबक्यातील वनस्पतींना अत्यंत आकर्षक निळ्या, जांभळ्या, लाल, रंगाची फुले येतात. मध्य ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात विविधरंगी दुर्मीळ फुलाचे गालिचे आकर्षित करतात.
सातारीतुरा म्हणजेच वायतुरा आहे. सह्याद्रीच्या पठारावर येणारी ही पहिली प्रजाती आहे. ती अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. अशा प्रकारच्या अनेक दुर्मीळ प्रजातीचे रक्षण करून पर्यावरणाचे संरक्षण होणे आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. - प्रदीप शिंदे, कास पठार, कर्मचारी