पेट्री : जागतिक वारसा व पर्यटनस्थळ असणाऱ्या कास पठाराविषयी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्हिडीओद्वारे परिसरातील ग्रामस्थांशी संवाद साधला. पश्चिम घाटाचे संवर्धन करण्याबरोबरच तेथील लोकांना व्यवसाय, शेती करण्यास कोणतेही बंधन नाही; परंतु प्रदूषण वाढेल, असा कोणताही उद्योग सुरू करता येणार नाही, असेही त्यांनी या संवादादरम्यान सांगितले. कास, ता. जावळी येथे परिसरातील चार गावांतील ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान, मंत्री जावडेकर यांची ग्रामस्थांशी संवाद साधणारी क्लिप दाखविण्यात आली. कास पुष्प पठाराचे संवर्धन, संगोपन, व्यवस्थापन या अनुषंगाने तेरेपॉलिसी सेंटरने ही बैठक आयोजित केली होती. उपवनसंरक्षण अनिल अंजनकर म्हणाले, ‘डिसेंबरअखेर कास व्यवस्थानाबद्दल आराखडा तयार करण्यात येईल. त्यानंतर तो हेरिटेज इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाला पाठविण्यात येणार आहे. पुढील हंगामासाठी ठराविक पॉइंटवर दर महिन्याला फोटोग्राफी करून निसर्ग, फुलांत काय बदल झाला आहे, ते समजणार आहे. येथील जैवविविधतेची संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. पुढील हंगामात ओरिएंटेशन फिल्म दाखविण्यात येईल. त्यानंतर कास पठारावर वर्तणूक कशी असावी, हे सांगूनच प्रवेश दिला जाणार आहे. यावर्षी गेल्यावर्षापेक्षा अधिक शुल्क जमा झाले आहे.’यूएनईटीचे माजी निदेशक डॉ. राजेंद्र शेंडे म्हणाले, ‘येथे जमा होणाऱ्या महसुलाचा उपयोग अतिशय दूरदर्शी होत आहे. सौरऊर्जा, गॅस, पाणीबंब यासारख्या सुविधा गावात उपलब्ध झाल्या आहेत. कास पठारावर रस्ते, गाईड, माहिती केंद्र, पार्किंग व्यवस्था चांगली असण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कास हे जगातील पहिल्या क्रमांकाचे पर्यटन केंद्र बनविण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.’कास संयुक्त वन व्यववस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू किर्दत यांनी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वन-वे आणि रोप-वे याविषयी माहिती दिली. सहायक वन संरक्षक खाडे यांनी पुढील वर्षापासून आॅनलाईन बुकिंग करूनच कास पठारावर प्रवेश दिला जाईल, असे सांगितले. वनव्यवस्थापन समितीत कुसुंबीमुराच्या समावेशासाठी निवेदन दिले, अशी माहिती ज्ञानेश्वर आखाडे यांनी दिली. (वार्ताहर)
जागतिक वारसास्थळाला पर्यावरणमंत्र्यांची ‘व्हिडिओ भेट’
By admin | Published: October 18, 2015 9:52 PM