सातारा : ‘मेरी कोम, विजेंद्रसिंह यांच्यापेक्षा महाराष्ट्रातूनही चांगले बॉक्सर घडू शकतात. हा खेळ फिजिकल फिटनेस येतो. तसेच जेणे करून ते तुमचं, तुमच्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं नाव जगभरात उज्ज्वल करतील,’ असा विश्वास अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग यांनी व्यक्त केले.सातारा तालीम संघाच्या मैदानावर महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने सातारा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने ७७ व्या युवा मुलांच्या व १६ व्या युवा मुलींच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धाच्या उद्घाटनप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते गोपाल देवांग बोलत होते.
यावेळी छत्रपती शिवाजीराजे भोसले, प्रा. नितीन बानुगडे- पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण, सातारा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार, सीआयएफसीचे कमांडट प्रशांत जगताप, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष बी. जी. आगवणे, महासचिव भरतकुमार व्हावळ, राज्याचे खजिनदार एकनाथ चव्हाण, सीआयडीचे पोलिस निरीक्षक भूषण आडके, राज्याचे सचिव डॉ. राकेश तिवारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोरगे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र
झुटिंग यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.गोपाळ देवांग म्हणाले, ‘मी २३ वर्षापासून बॉक्सिंग खेळतो आहे. मेरी कोम ही लहान असल्यापासून तिचा खेळ पाहिला आहे. ती खूप मेहनत घेते. विजेंद्रसिंगही मेहनत घेतो. नियमित सराव करतात. त्यांच्याप्रमाणेच आपल्या पाल्यांनाही तुम्ही बॉक्सिंगमध्ये करिअर घडविण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण द्या. तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या, ते तुमचे नाव उज्ज्वल करतील,’ असे त्यांनी सांगितले.
प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘राजधानी साताऱ्यात बॉक्सिंगची स्पर्धा होतेय ही अभिनंदनाची बाब आहे. साताऱ्याला मातीतल्या कुस्तीचा इतिहास आहे. तसा मुष्टीयुद्धाला सात हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.’महाभारताच्या काळात भीम आणि दुश्शासनाचे मुष्टीयुद्ध झाल्याचे ऐकले होते. हा क्रीडा प्रकार वेगळ्या जाणिवेचा आहे. आॅलिम्पिकपर्यंत मजल जाऊ शकते. हॉलिवूडपट निघाले, आता बॉलिवूडमध्येही बाक्सिंगपटूवर चित्रपट निघाले आहेत. नवीन पिढीने अशा खेळाकडे आकर्षण होऊ लागले आहे.
पुणे, मुंबई शहरात या खेळाकडे वळू लागले आहेत. या खेळामुळे जगण्यातला खरा आनंद समजतो. रागावर नियंत्रण मिळवता येते. जबाबदारीचं भान येतं.राजेंद्र चोरगे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र झुटिंग यांनी आभार मानले. यावेळी योगेश मुंदडा, सचिव राजेंद्र हेंद्रे, विश्वस्त रामचंद्र लाहोटी, युवराज भारती, दौलतराव भोसले, शैलेंद्र्र भोईटे, अरुण मदनेउपस्थित होते.शहरातून काढली रॅलीसातारा शहरातून सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्व खेळाडू, गुरुकुल स्कूलचे विद्यार्थी, तसेच उघड्या जीपमध्ये गोपाल देगाव, सागर जगताप हे होते. या रॅलीची सुरुवात सातारा तालीम संघापासून होऊन पुढे ही रॅली राजवाडा, ५०१ पाटी, पोलिस मुख्यालय, शाहू चौक अशी काढण्यात आली. या रॅलीने शहरवासीयांच्या नजरा रोखून धरल्या होत्या.