कऱ्हाड : महाराष्ट्रातून 'वेदांता' प्रकल्प जेवढ्या सहज गुजरातला गेला तेवढ्या सहज तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून बाहेर गेला असता का? असा सवाल करीत प्रादेशिक अस्मिता टोकदार करा. मग केंद्राचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल, असे मत राष्ट्रवादीचे खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.कराड येथे क्रिडाई संस्थेच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बाळासाहेब पाटील, सुभाषराव जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.अमोल कोल्हे म्हणाले, खरंतर तुम्ही भाग्यवान आहात. महाराष्ट्रात कऱ्हाड आणि नांदेडलाच दोनवेळा मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. तर एकट्या बारामतीला चारवेळा संधी मिळाली आहे हा भाग वेगळाच. कऱ्हाडला शैक्षणिक क्षेत्राचा मोठा वारसा आहे.त्याचबरोबर बेळगाव सोडल्यावर मध्ये फक्त कऱ्हाडच वैद्यकीय ‘हब’ आहे. आणि ज्याठिकाणी शैक्षणिक आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रगती आहे तेथे इतर प्रगतीला मोठी संधी असते. त्याचा फायदा सर्वांनी घ्यायला हवा.छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा नव्हे तर डोक्यात घेण्याचा विषय आहे. त्यामुळेच सी बी एस ई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास शिकविला जावा, यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगीतले.आग्रा भेटीचा थरार!लवकरच प्रदर्शित होणाऱ्या शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटाबद्दल बोलताना ते म्हणाले, या चित्रपटात आग्रा भेटीचा थरार उलगडून दाखविला आहे. इतर राज्यात चंदन, सोने तस्कर यांच्यावर चित्रपट काढले जातात. तेथील लोकांनी त्याला प्रतिसाद दिल्यानंतर ते इतर भाषेत डब होतात. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर असलेला हा चित्रपट एवढा लोकप्रिय करायचाय की तो इतर भाषेत डब झाला पाहिजे. म्हणजे छत्रपतींचा इतिहास सर्वदूर पोहोचेल.
ते कोणी सांगत नाहीकऱ्हाडला विमान उतरायला पाहिजे, त्याचं प्रशिक्षण मिळायला पाहिजे हे बरोबर आहे. मात्र, त्यामुळे बांधकाम व्यवसायावर मोठे संकट आले होते, हे अनेकजण सांगतात. ते सोडविण्यासाठी आमच्याकडे क्रिडाई संस्था आली. आम्ही त्यांना मदत केली. ते संकट दूर झालं. मात्र, ही अडचण कशामुळे आणि कोणामुळे आली, यावर कोणी बोलत नाही. असा चिमटा आमदार बाळासाहेब पाटील यांनी यावेळी काढला.