सातारा : कोरोना चाचणी केल्यानंतर अनेकजण चुकीचा मोबाइल नंबर देत असल्यामुळे डाॅक्टरांचे काम वाढत आहे. संशयित रुग्णाला चुकीच्या नंबरमुळे पाॅझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हे समजणे अवघड होत आहे. त्यामुळे पुन्हा डाॅक्टरांना संशयित रुग्णाच्या नावावरून शोध घ्यावा लागत आहे. त्यामुळे चाचणी केल्यानंतर मोबाइल नंबरची खात्री करूनच नंबर नमूद करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रोज दिवसाला सातशे रुग्ण बाधित आढळून येत आहेत. या रुग्णांची चाचणी जिल्हा शासकीय रुग्णालयात सध्या केली जात आहे. पूर्वी चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट पुण्याला पाठविले जात होते. मात्र, आता सिव्हिलमध्येच कोरोना चाचणी केली जात आहे. त्यामुळे रुग्णांना दुसऱ्या दिवशी रिपोर्ट समजत आहे. पण हा रिपोर्ट समजण्यात मोठी अडचण ठरतेय ती चुकीचा मोबाइल नंबर. अनेकजण कोरोना चाचणी झाल्यानंतर सिव्हिलमध्ये चुकीचा मोबाइल नंबर देत आहेत. या नंबरवर आपण कोरोना बाधित आहात की नाही, याचा मेसेज येत असतो. पण नंबरच चुकीचा दिल्यामुळे रुग्ण अहवाल कधी येईल या प्रतीक्षेत असतो. चार पाच दिवस उलटल्यानंतर अजूनही रिपोर्ट आला नाही, अशी तक्रार करत रुग्ण सिव्हिलमध्ये जात आहेत. त्यावेळी मात्र मग डाॅक्टर व लॅबमधील कर्मचाऱ्यांचे काम आणखीनच वाढत आहे. अनेकजण चुकीचे मोबाइल नंबर देत असल्याचे सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे याचा रुग्ण आणि डाॅक्टरांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गत काही दिवसांपासून हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे समोर येत आहे. कोरोना चाचणीसाठी गेलेला रुग्ण भीतीमुळे नंबरच चुकीचा देत असतात. काही वेळेला त्यांच्याजवळ मोबाइल नसतो. त्यामुळे मग अशा रुग्णांना कोरोनाचा अहवाल त्याच्याजवळ पोहोचविणे प्रशासनापुढे अवघड बनते. त्यामुळे नागरिकांनीच खबरदारी घेऊन कोरोना चाचणी झाल्यानंतर चालू स्थितीतील मोबाइल नंबर देणे गरजेचे आहे. तरच लवकरच रिपोर्ट आपल्याला समजून योग्य उपचार होण्यासाठी प्रयत्न होतील.
कोट : कोरोना चाचणी केल्यानंतर अनेकजण चुकीचा मोबाइल नंबर देत आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा रिपोर्ट समजण्यास अडचणी निर्माण होतात. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी मोबाइल नंबर देताना योग्य नंबर द्यावा तरच चाचणीचा लवकर रिपोर्ट आपल्याला समजेल.
डाॅ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा