वाई : भुर्इंज येथील पत्रकार समीर मेंगळे यांना मारहाण करणारे वाई पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बबनराव येडगे यांना निलंबित करावे, अशा मागणीचे निवेदन वाई पत्रकार संघाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांना देण्यात आले आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, पोलीस व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून असणाºया पत्रकारांचे नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. परंतु पोलीस जर कोणतीही शहानिशा न करता अशा प्रकारचे गैर कृत्य करून पत्रकारांना त्यांचे काम करण्यापासून दंडीलशाही करून रोखण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा प्रवृत्तीचा आम्ही सर्व वाई पत्रकार संघाचे प्रतिनिधी जाहीर निषेध करीत आहोत.
बसस्थानकात वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार समीर मेंगळे यांना आरोपी समजून कसलीही शहानिशा न करता येडगे यांनी मारहाण केली. समाजहिताचे काम करीत असताना पोलिसांनी सहकार्य करण्याचे सोडून पत्रकारांवर पोलीसच अत्याचार करीत असतील तर आज समाजात लोकशाहीचा चौथा स्तंभ सुरक्षित आहे का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार वाई पोलिसांनी थांबवावा, अन्यथा वाई पत्रकार संघाचे सर्व प्रतिनिधी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. तसेच वाई पोलिसांनी यापुढे कोणत्याही सहकाºयाची अपेक्षा बाळगू नये.
निवेदनावर वाई पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास साळुंखे, भद्रे्रेश भाटे, सुशील कांबळे, किशोर रोकडे, विश्वास पवार, धनंजय घोडके, पांडुरंग भिलारे, अनिल काटे, दौलतराव पिसाळ, माणिकराव पवार, अमोल महांगडे, विनोद पोळ, समीर मेंगळे, नीलेश पोतदार, महेंद्र गायकवाड यांच्या स्वाक्षºया आहेत.