प्रगती जाधव-पाटील।सातारा : आर्थिकदृष्ट्या सुखवस्तू नसलेल्या एका अवलियाला त्याच्यातील कलाकार गप्प बसून देईना. अवघ्या पंधरा दिवसांच्या प्रशिक्षण काळात त्याने टॅटू काढण्यातील बारकावे टिपले. सर्वाधिक अवघड समजल्या जाणाऱ्या ‘रिअलिझम’ अर्थात वास्तवदर्शी प्रकारात तो पारंगत झाला. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॅटू स्पर्धेत तब्बल ३० तास काम करून सुनील वाशिवले या अवलियाने कोरलेल्या ‘अफ्रिकन ट्रायबल लेडी’ला ४०० स्पर्धकांतून आंतरराष्ट्रीय पसंतीची पावती मिळाली.
वाई तालुक्यातील वाशिवली येथील सुनील वाशिवले या तरुणाचे शिक्षण वाशिवली गावात झाले. घरची परिस्थिती बेताची आणि अभ्यासापेक्षा कला क्षेत्राकडे कल असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं मुंबई गाठली. मुंबई गाठून तिथं त्यानं सगळ्यांच्या समाधानासाठी कपड्याचा व्यवसाय सुरू केला; पण यात फारसा रस नसल्यामुळे अपेक्षित यश आलं नाही. घर चालवण्यापेक्षाही आपल्याला काम करताना समाधान मिळावं, या उद्देशानं त्यानं कला क्षेत्रात काम करण्याचं निश्चित केलं.
तीन वर्षांपूर्वी आतल्या कलाकाराने घेतलेली उसळी त्याला मोठं यश मिळवून देऊ लागली. सुनीलने आत्तापर्यंत दिल्ली, राजस्थान, पुणे, मुंबई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन यश मिळविले आहे. गोंदण एकेकाळी सक्तीचं आणि त्रासदायक वाटत असलं तर आता परेदशातून टॅटू या गोजिरवाण्या नावाने ते दाखल झालं. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम बाजारपेठ आहेच; पण भारतातही याचे चाहते वाढत असल्याचं सुनीलनं हेरलं.
स्पर्धांना जाण्यासाठी आणि तिथे भरण्यासाठी आवश्यक पैसेही सुनीलकडे नव्हते. कधी मित्रांकडून तर कधी परिचितांकडून हातउसणे पैसे घेऊन त्याने या स्पर्धांमध्ये भाग घेतला. कला क्षेत्राविषयीचं आकर्षण व्यवसायात रुपांतरित करताना यशस्वी होण्याचं त्यानं ठरवलं होतं.
सातारकर म्हणून या यशाचा मला अभिमान आहे. माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठीशी राहिलेल्या प्रत्येकाचा माझ्या या यशात वाटा आहे. नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेतही साताºयाचे नाव उंचावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.- सुनील वाशिवले, वाशिवली, ता. वाई.