वाई (जि. सातारा) : ‘वाईतील विश्वकोशाचा नावलौकिक वेगळा असून, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. त्यांचा नावलौकिक वाढत राहावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यांचे विश्वकोश आदर्श स्मारक म्हणून विकसित केले जाईल. वाई शहराच्या बाहेर विश्वकोशाची इमारत व्हावी, जेणेकरून वाई-पाचगणी-महाबळेश्वरला येणारे पर्यटक या स्मारकाला भेट देतील. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा वारसा जतन करण्यासाठी विश्वकोशासाठी इमारत उभी करण्यात येईल,’ अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिली. वाई येथे विश्वकोशसंदर्भात जागेची पाहणी करण्यासाठी मंत्री केसरकर रविवारी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते.केसरकर म्हणाले, ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक व्हावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी मराठी विश्वकोशची भूमिका महत्त्वाची आहे. त्याचबरोबर, मातृभाषेतून शिक्षण हे महत्त्वाचं आहे. विश्वकोश जनतेसाठी खुले करणार, स्वतःची इमारत, लायब्ररी व सर्व सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. वाईचे विश्वकोश जागतिक दर्जाचे होणार, यासाठी उन्हाळी अधिवेशात मी पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी लागणारा निधी कमी पडू दिला जाणार नाही.’
वाईत विश्वकोशसाठी इमारत उभारणार, मंत्री दीपक केसरकरांनी दिली ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 12:36 PM