वाई : वाई नगरपरिषद हद्दीमध्ये आणि शहरालगत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संदर्भातील उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी वाई नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार मकरंद पाटील यांच्या
अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार बुधवारपासून संपूर्ण वाई शहर
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या अतिजोखीम संपर्कातील व्यक्तींचा संपूर्ण
शहरात वावर वाढत असल्याने प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी संपूर्ण वाई शहराच्या चारही बाजूच्या सीमा बंद करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. त्यानुसार बुधवार (दि. २८)पासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे शहरामध्ये कोणाही बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश मिळणार नाही, तसेच शहरातील कोणाही व्यक्तीला शहरातून बाहेर पडता येणार नाही, अशी माहिती वाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी दिली.
प्रशासनाकडून या संदर्भातील प्रतिबंधित क्षेत्रातील अटी-शर्ती, तसेच घ्यावयाची काळजी, याबाबतची माहिती देण्यासाठी गेल्या दोन
दिवसांपासून शहरामध्ये रिक्षाद्वारे अनाउन्सिंग करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या टीमद्वारे शहरामध्ये याबाबत जागृती केलेली आहे.
नागरिकांची जीवनावश्यक वस्तू, तसेच दैनंदिन गरजा याची होणारी गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिकेने विविध समित्या स्थापन केलेल्या आहेत. प्रत्येक प्रभागासाठी त्या-त्या प्रभागातील नगरपरिषद सदस्य, त्या प्रभागातील काही स्वयंसेवक आणि नगरपरिषदेने त्या प्रभागासाठी नेमलेले नियंत्रण अधिकारी यांची मिळून प्रभागस्तरीय समिती स्थापन केलेली आहे. शहरामध्ये अशा एकूण १० समित्या असून, त्या प्रभागातील नगरपरिषद सदस्य तिचे
अध्यक्ष आहेत. वाई शहर प्रतिबंधित क्षेत्राच्या सर्व बाजूंच्या रस्त्यांच्या सीमा पुढील आदेशापर्यंत सीलबंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना या संदर्भात कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी आपापल्या प्रभाग समिती अध्यक्षांशी संपर्क साधावयाचा आहे. सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.
कोट..
शहरामधे दिवसेंदिवस वाढत असणाऱ्या रुग्णसंख्येमुळे संपूर्ण शहर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा घरपोच पद्धतीने चालू राहतील. शहरातील सध्या असणाऱ्या सर्व रुग्णांशी नगरपालिकेचा सतत संपर्क आहेच. ते किंवा त्याव्यतिरिक्त इतर कोणालाही वैद्यकीय मदत लागल्यास, पालिकेच्या आपत्ती निवारण कक्ष अथवा संबंधित प्रभागांचे नगरसेवक यांना संपर्क केल्यास तत्काळ ती सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. तरी नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव घरातून बाहेर पटू नये.
- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी