वाई : ‘लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित झाल्यानंतर लोक मोठ्या
प्रमाणावर लस घेण्यासाठी तयार आहेत; पण लसीचा खंडित पुरवठा, लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना नसलेल्या सुविधा, यामुळे नागरिकांना मानसिक त्रास होत आहे. याबाबत
अखिल भारतीय ग्राहक पंचायत वाई तालुका यांनी शुक्रवार, दि. २८ रोजी लसीकरणाचा चाललेला सावळा गोंधळ या संदर्भात तहसीलदार रणजित भोसले यांना निवेदन देण्यात आले.
संघटनेचे पदाधिकारी हे गुरुवार दि. २७ रोजी लसीकरण केंद्रावर गेले असता कन्या शाळा वाई येथील केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची कोणतीही सोय नव्हती तसेच खूप वेळ रांगेत उभे राहूनही त्यांना ऐनवेळी लस संपली असे सांगण्यात आले. लोकांनी विचारणा केल्यावर तेथील कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केली, तसेच ज्यांचा वशिला असेल त्यांना परस्पर आतमध्ये प्रवेश देऊन लस दिली जाते. तरी या प्रकाराला आळा बसावा, या संदर्भाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षा शुभदा नागपूरकर,उपाध्यक्ष सतीश जेबले, संघटक किशोर फुले, सचिव श्रीमंत होनराव उपस्थित होते.