वाई : नगरपालिकेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, फोडाफोडीच्या राजकारणाने निवडणुकीची समीकरणे बदलत आहेत़ सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाला शह देण्यासाठी वाईतील सर्व विरोधकांनी एकत्र येऊन वाई शहरात वाई विकास महाआघाडीची स्थापना केली आहे़ यामध्ये काँग्रेस, भाजप, आरपीआय़, रासप व इतर पक्षांनी सत्ताधारी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन महाआघाडी केली आहे़ वाई पालिकेतील पारंपरिक विरोधक जनकल्याण आघाडीला दोन वेळा सत्तेने हुलकावणी दिली़ याचे मुख्य कारण विरोधकांमधील मतविभागणी असल्याने हे टाळण्यासाठी व यश मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे़ महाआघाडी होण्यासाठी माजी आमदार मदन भोसले, नंदकुमार खामकर, सचिन फरांदे, शेखर शिंदे, विकास शिंदे, विराज शिंदे, विवेक पटवर्धन भाजपचे विजया भोसले, अविनाश फरांदे, अजित वनारसे, सचिन घाडगे, विजय ढेकाणे, राजाभाऊ खरात, आरपीआयचे अशोक गायकवाड यांनी पुढाकार घेऊन वाई विकास महाआघाडीची स्थापना केली़ यावेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात यांनी भाजपामध्ये प्रवेश केला़ नंदकुमार खामकर म्हणाले, ‘गेली दहा वर्षे वाई नगरपालिकेत राष्ट्रवादी प्रणित तीर्थक्षेत्र आघाडीची सत्ता असून, शहरामध्ये विकासाला खीळ बसली आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे़ यातून वाई शहराला बाहेर काढून खऱ्या अर्थाने विकास करावयाचा झाल्यास महाआघाडीच्या पाठीशी राहा. ’ सचिन फरांदे म्हणाले, ‘आम्ही वेळोवेळी सक्षम विरोध म्हणून अनेकवेळा सभागृहात भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी बहुमताच्या जोरावार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.’ भाजपाचे अविनाश फरांदे म्हणाले, ‘सध्या राज्यात व केंद्रात भाजपाची सत्ता असून, वाई शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने भाजपाचे नेतृत्व मान्य करून सर्व विरोधकांनी एकत्र येऊन सत्ता परिवर्तन करुया़ ’ आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड म्हणाले, ‘आम्ही राज्यात व केंद्रात महायुतीचे घटक आहोत. शहरात चाललेला अनागोंदी कारभार थांबवून भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांकडून पालिकेची सुटका करण्यासाठी वाईकरांनी महाआघाडीच्या पाठीशी राहावे.’ माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात महणाले, ‘नेहमी विकासाला साथ देणार असून, माझ्या काळात विविध विकासकामे मार्गी लावली़ पालिकेला लागणारा सर्व निधी पाठपुरावा करून मिळविला़ राज्यात व केंद्रात सत्तास्थानी असणाऱ्या भाजपाच्या पाठीशी राहिल्याशिवाय शहराचा विकास होणे शक्य नाही़ म्हणून तो दृष्टिकोन ठेवूनच भाजपमध्ये प्रवेश केला आहे़ ’ यावेळी महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीला शह देण्यासाठी वाई विकास महाआघाडी
By admin | Published: October 27, 2016 11:23 PM