सातारा : खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी मुंबई येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. विधान सभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत डॉ. येळगावकरांसह अॅड. विलास आंबेकर व शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ. येळगावकर गेले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. ते खटाव येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश करणार होते. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. अखेर शुक्रवारी मुंबई येथे भाजप प्रदेश पक्ष कार्यालयात डॉ. येळगावकरांनी शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार गव्हाणकर, आमदार संचेती यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विरोधी पक्षनेते खडसे म्हणाले, डॉ. दिलीप येळगाकवर यांनी माण-खटावच्या दुष्काळाबाबत व पाणी प्रश्नासाठी मोठा लढा दिला आहे. पाण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. आघाडी शासनाकडे त्यासाठी प्रखर भूमिका मांडून जोरदार आग्रहही धरला. मात्र, आघाडी शासनाकडून त्यांचा भ्रमनिरास झाला. डॉ. येळगावकर यांना पूर्ण ताकद देण्यात येईल. तसेच त्यांचा पक्षाकडून योग्य सन्मान राखण्यात येईल. (प्रतिनिधी)
येळगावकर अखेर भाजपात
By admin | Published: September 07, 2014 12:05 AM