संतोष गुरव।कऱ्हाड : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास मनाशी बाळगून रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाड-डातील यशवंत हायस्कूलने बारा वर्षांपूर्वी गुरुकुल प्रकल्प सुरू केला. त्यातून सुमारे सहाशे ते सातशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील पंचवीस विद्यार्थ्यांनी गणित, संस्कृत, समाजशास्त्र विषयात पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले असल्याने हायस्कूलचा गुरुकुल प्रकल्प हा लय भारी ठरला आहे.
१३ जून १९५९ रोजी कऱ्हाड येथे यशवंत हायस्कूलच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना उत्तम गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यास प्रारंभ केला. शासनाच्या प्रत्येक उपक्रमाची प्रभावीपणे व यशस्वीपणे अंमलबजावणी येथील शिक्षकांनी केली आहे. ४१ शिक्षकांची मान्यता असून, सध्या ३७ शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून १६०८ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या ठिकाणी ३० तुकड्यामध्ये १२ गुरुकुल, ६ सेमी इंग्रजी आणि १२ मराठी माध्यमांच्या तुकड्यांचा समावेश आहे. हायस्कूलचा यावर्षीचा निकाल हा ९७.५० टक्के लागला असून, ९० टक्केपेक्षा जास्त हे ४७ विद्यार्थी आहेत.
नॅशनल मिरिट स्कॉलरशीप स्पर्धेत हायस्कूलचे ११ विद्यार्थी पात्र झाले आहेत. त्यांना वर्षाकाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्तीही मिळत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर क्रीडा, व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता चाचणी असे शिक्षण दिले जाते. त्यामुळे दहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय परीक्षेत निवड झाली आहे.गुरुकुलमधून असे दिले जाते शिक्षण...यशवंत हायस्कूलमध्ये बारा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गुरूकुल प्रकल्पातून शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशीपच्या परीक्षांबाबत शिक्षक व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या ध्येयाला अनुसरून संगणक प्रशिक्षण हे आॅनलाईन पद्धतीच्या माध्यमातून दिले जाते. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सकाळी दोन तोस तसेच शाळा सुटल्यानंतर सायंकाळी दीड तास मार्गदर्शन केले जाते.विद्यार्थी विकासासाठी समित्यांची स्थापना
रयत शिक्षण संस्थेच्या कऱ्हाड येथील यशवंत हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शाळा विकास समिती, स्कूल समिती, शालेय व्यवस्थापन समिती अशा अनेक समित्या स्थापन केल्या आहेत.
रयत शिक्षण संस्थेच्या यशवत हायस्कूलमध्ये गुरुकुल प्रकल्प हा २००७ मध्ये सुरू करण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून वर्षाला सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले जाते. पुस्तकी शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठीही हायस्कूलमधील प्रत्येक शिक्षक परिश्रम घेत आहेत.- ए. एस. साळुंखे, मुख्याध्यापक, यशवंत हायस्कूल, कºहाड