लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक उभारण्याच्या आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एकूण ९ कोटी ३ लाख ६ हजार ८०३ रुपयांच्या आरखडा आहे.सह्याद्र्री राज्य अतिथीगृहात सोमवारी शिखर समितीची बैठक पार पडली. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सातारचे पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार राजेंद्र्र पटणे, आमदार शिवाजीराव नाईक, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.सातारा जिल्हा परिषदेच्या आवारात दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्याबाबतच्या आराखड्यासही यावेळी मान्यता देण्यात आली. यापूर्वी दिवंगत यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्ताने जिल्हा परिषद परिसरात बहुद्देशीय सभागृह बांधण्यासाठी शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी वितरीत केला होता. यासाठी जिल्हा परिषद सेस फंडात ३ कोटी ९० लाख रुपये दिले होते. सभागृहातील विद्युतीकरणाच्या कामासाठी अजून ८४ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तसेच स्मारक बांधण्यासाठी एकूण ८ कोटी १९ लाख ६ हजार ८०३ रुपयांचा आराखडा शिखर समितीच्या मान्यतेसाठी बैठकीमध्ये ठेवण्यात आला.सभागृहाचे विद्युतीकरण आणि स्मारकाचा विकास आराखडा असा एकूण ९ कोटी ३ लाख ६ हजार ८०३ रुपयांच्या आरखड्यास शिखर समितीने मान्यता दिली. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय, पाणीपुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव शामलाल गोयल, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व्ही. गिरीराज, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्र्रे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, ग्रामविकासचे सचिव असीम गुप्ता, वन विभागाचे सचिव विकास खारगे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, बी. जे. जगदाळे उपस्थित होते.
यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या आराखड्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:38 PM