लोकमत न्यूज नेटवर्क
कुडाळ : दरवर्षीप्रमाणे होणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सव गतवर्षापासून कोरोनाने थोपावले आहे. सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी भावनिकतेबरोबर सामाजिक आरोग्यासाठी यावर्षी गावोगावच्या यात्रा, सण, उत्सव रद्द करावे लागले. यामुळे गावोगावच्या यात्रासुद्धा एकत्रितपणे साजऱ्या न होता अगदी साधेपणानेच करण्यात येत आहेत.
यामुळे यात्रा, जत्रांमधून होणारी आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. या हंगामात तीन-चार महिने फिरून व्यवसाय करणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. मनोरंजनासाठी यात्रेनिमित्त रंगणारा तमाशाच्या फडातील कलावंतांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच पहिल्या लाटेतून सावरतानाच कोरोनाची दुसरी लाट अधिकच घातक होत आहे. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनालाही कठोर व्हावे लागत आहे. यासाठी गावोगावच्या नागरिकांनीही सहकार्याने यावर्षीही ग्रामदैवतांचे उत्सव साधेपणानेच करण्याचा निर्णय घेतला आहे.
हिवाळा संपत आला की ग्रामीण भागात यात्रांचा हंगाम सुरू होतो. चाकरमानी आवर्जून गावी येत असत. दोन-चार घर भरल्यासारखं असल्याचं. या साऱ्याला कोरोनाची नजर लागली. गावचा हा सारा उत्सव विरून गेला. गतवर्षीच्या मार्चपासून यावर्षीही हीच परिस्थिती असल्याने यात्रा, उत्सव साधेपणानेच होत आहेत. यामुळे गावोगावच्या यात्रा कमिट्यांनी कोरोना महामारीत पुढाकार घेऊन गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. यात्रेकरिता जमा होणारी लोकवर्गणी कोरोनाला रोखण्यासाठी वापरायला हवी.
चौकट : यात्रेसाठी गावपातळीवर वर्गणी गोळा केली जाते. आता यात्राच होणार नसल्याने यावर होणारा खर्च कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी उभा केला तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गावे व माणसे वाचणार आहेत. शासनाच्या मदतीची वाट न पाहता गावातील यात्रा कमिट्या व आपत्ती व्यवस्थापन समित्यांनी एकत्र येऊन गाव कोरोनामुक्त होण्यासाठी काम करणे गरजेचे बनले आहे. यात्रेसाठी होणारा खर्च होणारा पैसा कोरोनाच्या महामारीत गावात आरोग्यसुविधा निर्माण होण्यास कामी आल्यास खरा भक्तिभाव साजरा होईल.