अंगापूर : सातारा जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असणाऱ्या आबापुरी-वर्णे (ता. सातारा) येथील स्वयंभू श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरीची यात्रा यंदाही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे व प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे.
५ ते ८ एप्रिलपर्यंत चालणारी ही यात्रा, राज्यात तसेच सातारा जिल्ह्यात दररोज वाढत असलेल्या कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ व प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. यात्रा कालावधीत फक्त धार्मिक विधी होणार असून, छबिना निघणार नाही. यात्रा स्थळापासून दहा किलोमीटरच्या परिसरात संचारबंदी असून कोणीही या परिसरात प्रवेश करू नये. मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारचे दुकान लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार आशा होळकर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तलाठी रेखा कोळी, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे, बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी बाबा महाडिक, किरण निकम, विजय साळुंखे, राजू शिंदे, कपिल टिकोळे, सरपंच विजय पवार, उपसरपंच कुसुम पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यात्रा काळात गावात पै-पाहुणे व इतर कोणीही प्रवेश केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे बैठकीत नमूद करण्यात आले. यात्रेनंतर देखील काही दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस देवस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.