वडगाव हवेली : परिसरातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या येथील ग्रामदैवत खंडोबा देवाची आज, सोमवारी होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत नियमानुसार धार्मिक पूजा कार्यक्रम होणार असून, याशिवाय इतर सर्व कार्यक्रम होणार नसल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रेनिमित्त पालखी वगळता सहभागी होणाऱ्या बैलगाड्या, रथ, सासनकाठ्या, दिवट्या यांसह भाविकांना यात्रेमध्ये गर्दी करण्यास मनाई केली आहे. प्रतिवर्षी परिसरातील हजारो भाविक या यात्रेसाठी येत असतात. यावर्षी मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. येथील ग्रामदैवत खंडोबा यात्रेबाबत ग्रामपंचायतीची बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये आवश्यक धार्मिक कार्यक्रम वगळता यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कऱ्हाडला घरोघरी जनजागृती सुरू
कऱ्हाडला : कऱ्हाडला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागातील महिलांसह स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमातील स्वच्छतादूत यांच्याकडून घरोघरी जाऊन महिलांना स्वच्छताविषयी मार्गदर्शन केले जात आहे. घरातील ओला व सुका कचरा कसा साठवावा, त्याचे कशाप्रकारे फायदे आहेत, अशी विविध माहिती महिला कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे. घंटागाडी येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर संबंधित ठिकाणी जाऊन जनजागृती केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कऱ्हाडला पालिकेने सलग दोन प्रथम क्रमांकाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. यावर्षी पुरस्काराची ‘हॅटट्रीक’ करण्यासाठी पालिका कसून प्रयत्न करीत असून, नागरीकही त्यासाठी प्रतिसाद देत आहेत.
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर वॉच
कऱ्हाड : कऱ्हाड शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, याच्या कारवाईसाठी एक पथकही स्थापन केले आहे. या पथकातील अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांकडून शहरात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संबंधितांना पकडून त्यांना दंडही केला जात आहे. कऱ्हाड शहर स्वच्छ व सुंदर राहावे, यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. तसेच स्वच्छताविषयक नियमांचीही कठोर अंमलबजावणी केली जात असून, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यास पालिकेने पथकाची नेमणूक केली आहे.
हेळगावात रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्णत्वाकडे
मसूर : सहकार व पणनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून हेळगाव (ता. कऱ्हाड) येथे राजे ग्रुप चौक ते कुंभार आळी या भागातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम मंजूर झाले होते. ते काम पूर्णत्वाकडे गेले आहे. या भागात रस्त्याची रुंदी कमी होती. त्यामुळे चारचाकी वाहन आल्यास अडथळा निर्माण होत होता. ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगातून रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही दिवसांपूर्वी बंदिस्त गटर बांधले आहेत. आता रस्त्याचे काम होत असल्याने रस्त्याची रुंदी वाढली आहे. त्याचबरोबर वाहनांना होणारा अडथळा दूर झाला आहे. हे काम होत असल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
मलकापूर : आगाशिवनगरात रस्त्यावरील पार्किंगमुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांनी याबाबत पोलिसांसह पालिकेकडे अनेक लेखी तक्रारी केल्या. या सर्व तक्रारीचा विचार करून पालिकेने अतिक्रमण हटाविण्याचा विषय गांभीर्याने घेतला होता. कोल्हापूर नाका ते नांदलापूर हद्दीपर्यंत दोन्ही उपमार्गावर व कऱ्हाड ते ढेबेवाडी रस्त्यालगत अनेक विनापरवाना हातगाडे, वाहनातून रस्त्यांवरच व्यवसाय करीत आहेत. काही ठिकाणी फुटपाथवर दुकाने, तर रस्त्यावर पार्किंग होत असल्यामुळे अनेकवेळा वाहतूक कोंडी व अपघात घडले आहेत.