महाबळेश्वर : ‘पुस्तकांचे गाव म्हणून भिलार हे देशात प्रसिद्ध होत आहे. भिलारप्रमाणेच ‘पुस्तकांचे गाव’ हा प्रकल्प राज्यातील अनेक गावांत राबविला तर भविष्यात महाराष्ट्र हे पुस्तकांच्या गावाचे राज्य म्हणून अल्पावधीत नावारुपास येईल,’ असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, नव्याने सुरू करण्यात आलेल्या दालनांमध्ये हिंदी व गुजराती भाषेतील पुस्तकांचा समावेशही करण्यात आला आहे.मराठी भाषा विभागाच्या वतीने भिलार येथे ‘पुस्तकांचे गाव’ हा अभिनव प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाला ४ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्तीनिमित्त मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते भिलार येथे खुल्या प्रेक्षागृहाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच वर्षपूर्तीचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मंत्री देसाई बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव भूषण गगराणी, बाळासाहेब भिलारे, सभापती रुपाली राजपुरे भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, उपविभागीय अधिकारी अस्मिता मोरे, राजेंद्र राजपुरे, तहसीलदार रमेश शेंडगे, नितीन भिलारे, किसन भिलारे, विजय भिलारे, अजित कासुर्डे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.कार्यक्रमास डॉ. सदानंद मोरे, डॉ. माधवी वैद्य, श्यामसुंदर जोशी, भारत ससाणे, योगेश सोमण, प्रदीप निफाडकर, मोनिका गजेंद्र्रगडकर, ल. म. कडू, विनायक रानडे, अतुल कहाते, विश्वास कुरंदकर यांच्यासह जिल्ह्यातील पुस्तकप्रेमींनी हजेरी लावली. सायंकाळी श्रीराम मंदिरात साहित्यिक आणि रसिक यांच्यात गप्पांची मैफल रंगली होती.पुस्तकांसाठी पाच दालनेवर्षपूर्तीनिमित्त नव्याने सुरू करण्यात आलेल्या दालनांमध्ये स्पर्धा परीक्षा, चरित्र व आत्मचरित्र, कादंबरी, नाटक सिनेमा व चित्रमय पुस्तके अशा पाच बहुभाषिक दालनांचा समावेश आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी, गुजराती, अशा भाषेतील पुस्तकांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे पुस्तकाचे गाव आता बहुपुस्तकांचे गाव म्हणून नावारुपाला येणार आहे.पर्यटकांची संख्या वाढणार : देसाईसंस्कृती व पर्यटन यांनी हातात हात घालून काम केल्यानंतर काय होते, हे भिलारमध्ये पाहावयास मिळते. या प्रकल्पामुळे येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. अॅम्पी थिएटरसाठी उद्योग विभागाने मदत केली. या पुढेही आपण सूचवाल, त्यासाठी उद्योग विभाग हमखास प्रतिसाद देईल. मराठी भाषेसाठी तुम्ही कोणाकडेही काहीही मागा कोणी नाही म्हणणार नाही, असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.वाचन संस्कृती वाढतेय : तावडेभिलार येथे सुरू करण्यात आलेल्या पुस्तकांचे गाव या प्रकल्पामुळे राज्यातील वाचन संस्कृती जोमाने वाढत आहे. मराठी भाषा विभागाकडे आर्थिक टंचाई आहे. मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांकडे झोळी पसरली की भरभरून मिळते, हे मी अनुभवले आहे आणि त्यामुळेच येथील खुले प्रेक्षागृह आज येथे उभे राहिले आहे.राज्यातीलच नव्हे तर आता परराज्यातील पर्यटकांची पावले भिलारकडे वळत आहेत, असे मत यावेळी मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
भिलारमध्ये हिंदी, गुजराती पुस्तके पुस्तकांच्या गावात वर्षपूर्ती सोहळा : खुल्या प्रेक्षागृहासह, स्मरणिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:48 PM