आॅनलाईन लोकमतसातारा, दि. ५ : सातारा जिल्ह्यात मान्सून उशिरा सक्रिय झाला असला तरी गेल्यावषीर्पेक्षा यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. एक जून पासून ५ जुलै पर्यंत जिल्ह्यात ३ हजार २०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जिल्ह्यात केवळ १३०० मिलीमीटर पाऊस झाला होता.सातारा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान सुमारे ८ ते ९ हजार मिलीमीटर इतके आहे. जून महिन्यात चांगला पाऊस झाला तरच पाऊस सरासरी गाठतो. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे वेगळेच चित्र निर्माण झाले होते. पाऊस लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असताना २० जून नंतर जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय झाला. प्रारंभी पावसाने पूर्वकडील माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांमध्ये दमदार हजेरी लावली. मात्र, यानंतर पूर्व भागात पावसाने पूर्णपणे दडी दिली. पावसाअभावी पूर्व भागातील पेरण्या खोळंबल्या असून बळीराजाच्या नजरा पावसाकडेच लागून राहिल्या आहे. आजपर्यंत झालेल्या पावसावरच येथील काही शेतकऱ्यांनी पेरणीची कामे पूर्ण केली आहेत.एक जून पासून आजअखेर सर्वात कमी ८३.७ मिलीमीटर पाऊस कोरेगाव तालुक्यात तर सर्वाधिक १ हजार ३२४ मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वर येथे करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजअखेर ३ हजार २०० मिलीमीटर पाऊस झाला असून, पावसाची सरासरी २९०.९ इतकी आहे.
पावसाची तालुकानिहाय आकडेवारी
मिलीमीटरमध्ये (कंसात एकूण पाऊस)सातारा ७.० (२३६.४), जावळी १५.४ (४३९.७), पाटण १९.९ (२८४.१), कऱ्हाड ६.० (९२.१), कोरेगाव १.० (८३.७), खटाव २.९ (१४०.१), माण ० (१७२.३), फलटण ० (१०६.८), खंडाळा ०.६ (१३१.८), वाई ४.८ (१८९.२), महाबळेश्वर ८५.५ (१३२४.२)
कोयनेत ३४.३८ टीएमसी साठा
जिल्ह्यातील कोयना हे सर्वांत मोठे धरण असून याची पाणीसाठवण क्षमतर १०५.२५ टीएमसी आहे. धरणात यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी पाच जुलै रोजी धरणात १९.८६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यंदा मात्र ३४.३८ टीएमसी पाणसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात मुसळाधार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. मात्र, चार दिवसांपासून जोर ओसरल्यामुळे पाण्याची आवकही कमी झाली आहे.