लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या शाळेतील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा यंदा दोन टप्प्यांत होणार आहे. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा ताण हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार गेल्या दोन वर्षांपासून सर्व व्यस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रथम भाषा व गणित विषयासाठी वर्षभरात तीन चाचण्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात चाचणी १ मध्ये पायाभूत चाचणी, चाचणी २ मध्ये संकलित मूल्यमापन १ चाचणी आणि चाचणी ३ मध्ये संकलित मूल्यमापन २ चाचणी घेण्यात येतात.सलग आलेले सण आणि शिक्षकांच्या बदल्यांमुळे शाळेवर गैरहजेरी यामुळे परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यानुसार दिवाळीआधी समाजशास्त्र, हिंदी, संस्कृत, कार्यानुभव याविषयांची परीक्षा होणार आहे. तर दिवाळीनंतर मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या चार विषयांची परीक्षा होणार आहे.सुटी जाणार अभ्यासात !परिक्षेनंतर येणारी सुटी मुलांसह पालकांनाही आनंदाची वाटते. पहिल्या सत्राच्या अभ्यासाच्या ताणातून मुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनाही सुटीत अभ्यास नकोसा वाटतो. शाळेत जायला लागल्यापासून दिवाळीची सुटी म्हणजे पहिल्या सत्राची समाप्ती असे गणित होते. यंदा मात्र परीक्षेचा निम्मा ताण सुटीनंतर असल्यामुळे यंदाची सुटी अभ्यासातच जाणार, अशी परिस्थिती दिसत आहे.
सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना पहिली ते नववीपर्यंतच्या मराठी, गणित, विज्ञान आणि इंग्रजी याविषयांच्या प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून येतात. यंदा मात्र ८ नोव्हेंबरनंतर या चार विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, याच्या परीक्षा दिवाळीनंतर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आंतरिक मूल्यमापन शालेय स्तरावर दिवाळीच्या आधी होईल.- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, सातारा
उन्हाळी आणि दिवाळी या दोन्ही सुटीमध्ये मी मुलांना घेऊन माहेरी जाते. मुलांच्या सुटीच्या निमित्ताने माहेरी जाता येते. यंदा मात्र परीक्षेची टांगती तलवार असल्यामुळे पर्यटन आणि पाहुण्यांकडे जाण्याचा बेत रद्द केला आहे.- ऐश्वर्या नारकर, पालक