सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून बाहेर पडलेले डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना अजून राज्यस्तरीय नेतृत्वाकडून कोणताही निरोप आलेला नाही. विशेष म्हणजे, येळगावकर अजून भाजपच्या तालुका प्रमुखांशीच चर्चा करत बसले आहेत. मात्र, त्यांनी आपला भाजप प्रवेश कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊनच करणार असल्याचे जाहीर केले आहे. डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून दोन दिवस उलटले आहेत. त्यांच्या जाण्याचे राष्ट्रवादीनेही फारसे मनावर घेतलेले नाही आणि येळगावकरांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा फारसा काही मनाला लावून घेतलेला नाही. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तर ते ना आलेल्याचे समाधान ना गेलेल्याचे दु:ख अशी प्रतिक्रिया देऊन येळगावकरांच्यावरील आपला राग व्यक्त केला आहे. त्यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.दरम्यान, येळगावकर जाण्याचीच राष्ट्रवादी वाट पाहत होते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी तीन दिवसांपूर्वी मायणी येथे मेळावा घेतला आणि आपण पुढे काय करायचे, या अनुषंगाने निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येकांनी त्यांना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. येळगावकरांनीही तोच निर्णय मान्य केला आहे. मात्र, प्रत्यक्षात येळगावकरांना भाजपकडून अजून कोणताही निरोप आलेला नाही. या तीन दिवसांत त्यांनी फक्त जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशीच आपली बोलणी सुरू ठेवली आहेत. राज्यपातळीवरील एकाही नेत्यांशी त्यांनी संपर्क साधलेला नाही आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. (प्रतिनिधी)
येळगावकरांना प्रतीक्षा भाजपच्या निरोपाची
By admin | Published: July 11, 2014 12:27 AM