रशिद शेख
औंध : सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजविला आहे. ग्रामीण भागात तर यंदा रुग्णसंख्येचे खूपच प्रमाण आहे. अशातच खटाव तालुक्यातील औंधनजीकच्या येळीव गावाने आपले गाव कोरोनामुक्त करण्यात यश मिळवले असून, ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फलित असून इतर गावांनीही आपले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.
येळीव गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक-दोन करता करता ३५ रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्यातील तीन जणांना दुर्दैवाने कोरोनाशी लढताना अपयश आले तर ३२ जणांनी शनिवारी कोरोनावर मात केली, या सर्वांचा सत्कार ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आला.
येळीव ग्रामपंचायतीने रुग्ण सापडलेल्या बाधित घरात एक दिवसांआड निर्जंतुकीकरण फवारणी केली. तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सर्व सदस्य, तलाठी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मिळून कोरोनाबाधितांना आधार दिला. तुम्ही नक्की यातून बरे होणार, हा आत्मविश्वास प्रत्येक बाधिताला दिला. ग्रामपंचायतीने मास्क बंधनकारक केला तर सोशल डिस्टन्ससाठी प्रबोधन केले. ग्रामस्थांच्या सहकार्याने विलगीकरण कक्षाची स्थापना केली. मात्र, विलगीकरणात ठेवण्याची वेळ आली नाही. पूर्वतयारी म्हणून ग्रामस्थांनी सर्व उपाययोजना केल्या व त्याचेच फलित म्हणून संपूर्ण गाव कोरोनामुक्त झाले. येळीव गावचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
(कोट..)
येळीव ग्रामस्थांनी सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, सर्वांनी हातात हात घालून काम केल्याने हे यश मिळाले असले तरी पुढील १५ दिवस कोणीही परगावी जाऊ नये, अशा पद्धतीने आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत. यापुढेही कोरोनाला वेशीवरच रोखण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत.
-केशव जाधव, उपसरपंच, येळीव
फोटो:-येळीव येथे ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.(छाया-रशिद शेख)
===Photopath===
190521\img-20210517-wa0403.jpg
===Caption===
फोटो:-येळीव येथे ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.(छाया-रशिद शेख)