वडूज : खटाव तालुक्यातील येलमरवाडी गावात गतवर्षी एकही कोरोना बाधित होऊ दिला नाही. ग्रामपंचायतीचे सुयोग्य नियोजन व योग्य निर्णयामुळे कोरोनाला वेशीवरच अडविले होते. पण यावर्षी गावामध्ये ४६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन व ग्रामस्थांच्या एकजुटीने येलमरवाडी गाव कोरोनामुक्त झाले.
येलमरवाडी गावात यावर्षी ४६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. काहींना रुग्णालयात भरती केले, तर काहींना घरीच विलगीकरणामध्ये ठेवले होते. कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामपंचायतीने कंबर कसून प्रयत्न केले. सरपंच, उपसरपंच, पोलीसपाटील, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांची खंबीर साथ या सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्याने गाव कोरोनामुक्त करण्यात यश आले.
या महामारी काळात खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून मात मिळवली. गावामध्ये नियमित औषध फवारणी सुरू ठेवली, तर तपासणीवर जास्त भर दिला.
काही मोजकेच रुग्ण बाधित सापडल्याने ग्रामपंचायत, ग्रामस्थ, आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी एकजुटीने विविध उपाययोजना राबविल्या. त्यामुळे गाव कोरोनामुक्त होण्यास एक प्रकारे मदतच झाली.
याबरोबरच कोरोना होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी आपली आणि कुटुंबाची कशी काळजी घ्यावी, याची जनजागृती गावातील मंदिराच्या व ग्रामपंचायतीच्या ध्वनीक्षेपकाद्वारे करण्यात येत असे.
राज्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर गावात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीच्यावतीने या काळात ‘गावबंद’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्याअंतर्गत गावकऱ्यांना कामाशिवाय गावात फिरायला मनाई करण्यात आली आणि अत्यावश्यक असेल तरच बाहेरगावी जायला परवानगी दिली जात होती. सध्या एक महिन्यापासून गावामध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. याकामी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलीसपाटील, आशा स्वयंसेविका, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांची मोलाची साथ लाभल्यानेच गाव कोरोनामुक्त झाले.
कोट..
सध्या गावात एकही बाधित रुग्ण नसला तरीदेखील ग्रामस्थांनी गाफील न राहता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून इथून पुढे कोरोनाला वेशीवर रोखण्यासाठी सहकार्य करावे.
पोपट शिंगाडे, सरपंच, येलमरवाडी
-----------------------------------