लोकमत न्यूज नेटवर्क
वडूज : खटाव तालुक्यात गतवर्षी वरुणराजाची कृपादृष्टी समाधानकारक झाली असल्याने पाणी प्रकल्पात ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीसाठा पन्नास टक्क्यांवर आहे. त्यामुळे परिणामी सर्व गावे आणि वाड्या-वस्त्या टँकरमुक्त राहणार आहेत. कोरोना महामारी आणि मिनी लाॅकडाऊनच्या काळात नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही.
खटाव तालुक्यातील भूगर्भातील पाणीपातळी टिकून असल्याने शेतकरीवर्ग समाधानी आहे. उपलब्ध पाण्यावर उन्हाळी पिके हाती घेतली जात आहेत. यावर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही इतका पाणीसाठा येरळवाडी तलाव आणि तालुक्यातील प्रमुख पाझर तलाव्यात साठून आहे. येरळवाडी तलाव्यावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला पाण्याची कमतरता जाणवणार नाही. इतका मुबलक पाणीसाठा आहे. येरळवाडी तलावात सध्या पन्नास टक्के पाणीसाठा आहे तर नेर तलाव्यामध्ये ४२.७५ टक्के, मायणी तलाव्यात ५८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. सरासरी सर्व प्रकल्पांत चाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर खटाव तालुक्यात पिण्याचा पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न गंभीर होत असतो. परिणामी प्रशासनाला पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागत होते. शेती पाण्यासाठी उरमोडी व तारळी प्रकल्पातील अतिरिक्त आवर्तंनावर अवलंबून राहावे लागत होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर टँकर मागणी प्रस्तावांना प्रवास करावा लागत असे. मात्र, यावर्षी टँकर मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे आलेला नाही. आगामी काळातही पिण्याच्या तुटवडा भासणार नसल्याचे चित्र यावर्षी तालुक्यात दिसून येत आहे. खटाव तालुक्यात पाणी फौंडेशनच्या काम कमी प्रमाणात झाले असले तरी दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत काही मोजक्याच गावांतील ग्रामस्थांनी अगदी आबालवृद्धांसह एकजुटीने श्रमदानातून काम केले होते. गावागावांत श्रमपंढरी फुलली अन् मोठ्या प्रमाणात श्रमदानातून कामे झाली होती. या कामांवर
गतवर्षी निसर्गाने कृपाछत्र धरले आणि सर्व जलस्रोत भरून गेले. त्याचा परिणाम ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाहायला मिळत आहे. अनेक गावांमध्ये शिवारातील विहिरींची पाणी पातळी अवघ्या पाच फुटांवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चाैकट : उरमोडी धरणातून पाण्याचे आर्वतन सुरू
मध्यम प्रकल्पाचा शेती सिंचनासाठी फायदा होत असून यामध्ये प्रामुख्याने नेर, दरूज, येळीव, सातेवाडी, मायणी व कानकात्रे गावासाठी शेती पाण्यासाठी प्रसंगी उपयोग होतो आहे. खटाव तालुक्यात १६ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत तारळी व उरमोडीचे कॅनाॅलद्वारे पाणी आवर्तन सुरू आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन हे पाणी सलग ठेवण्यासाठी शेतकरीवर्गातून मागणी होऊ शकते.
चाैकट :
सध्याचा पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये
१) नेर - ५.०४,
२) दरूज - १.४०
३) सातेवाडी - ०.४०
४) मायणी - ०.८५
५) कानकात्रे - १.५९
-------------------
फोटो आहे :
फोटो : पावसाळ्यातील येरळवाडी तलावाचे विहंगम दृश्य (शेखर जाधव)