जिंती : फलटण तालुक्यातील जिंती गावातील योगेश वाघमारे यांचा शर्यतीचा भारत नावाच्या बैलाचा बुधवारी (दि. २८) लम्पी रोगाने मृत्यू झाला आहे. जिंती गावामध्ये लम्पी आजाराने दुसरा मृत्यू झाला असून, आठ दिवसांपूर्वी एका गायीचा मृत्यू झाला होता. लम्पी रोगाने गावामध्ये शिरकाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.वाघमारे कुटुंबामध्ये आवड म्हणून शर्यतीचा बैल सांभाळत होते; परंतु यावर्षी लम्पी आजाराने तालुका, जिल्ह्यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही जनावरांसाठी योग्य ती लस नसल्याने मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. लम्पीच्या बैलाचा मृत्यू झाल्याने लाखाेंचे नुकसान झाले. लम्पीच्या आजारापासून बैलाला वाचविण्यासाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी तसेच खासगी डॉक्टरची टीम प्रयत्न करत होती; परंतु डॉक्टरांच्या हाती अपयश आले. दि. २८ रोजी बैलाचा मृत्यू झाला. यामुळे वाघमारे कुटुंब व गावातील मित्रांचे अश्रू अनावर झाले. बैलाच्या मृत्यूने गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.तसेच दहा दिवसांपासून बैलाला लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याने वाघमारे कुटुंबीयांनी त्याच्या उपचारासाठी हजारो रुपये खर्च करूनही बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे वाघमारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बैलगाडीतून लाडक्या ‘भारत’ची अंत्ययात्रा काढतेवेळी संपूर्ण कुटुंबाने आक्रोश केल्याने उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेले. राज्य शासनाने लम्पीच्या रोगासाठी लवकरात लवकर योग्य ती लस आणून ग्रामीण भागातील जनावरे वाचवायला हवीत, असे आवाहन नागरिकांनी केले आहे.
चार लाखांना मागणीभारत नावाच्या बैलाने विविध शर्यतींमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यामुळे या बैलाला मागील काही दिवसांत चार लाख रुपयांची मागणी होत होती. मात्र, शर्यतीची आवड असल्याने विकण्यास नकार दिला.