मलटण : भारताच्या सीमेवर दहशतवादी विरोधी पथकात लढणाऱ्या फलटण येथील एका सैनिक पित्याची तब्येत कोरोना संसर्गामुळे मध्यरात्री दीड वाजता अत्यवस्थ झाली. घरात त्यांची मुलगी व तिची दोन लहान मुले एवढेच लोक होते. रात्रीची वेळ असल्याने मदत मिळेना. याचवेळी मलटण येथील प्रसाद कारखानीस यांनी या सैनिक पित्याला मदत करावी असा संदेश सोशल मीडियावर टाकला अन् काही वेळेत बेड उपलब्ध करुन देण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका सैनिक पित्याची तब्येत कोरोनामुळे अचानक बिघडली. पण कोठून मदत मिळत नव्हती. हे समजल्यावर प्रसाद कारखानीस यांनी ‘एका सैनिक पित्याला मदत करावी,’ असा संदेश सोशल मीडियावर टाकला. हा संदेश मलटणच्या ‘लोकमत’ प्रतिनिधीने उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांना पाठवला.
सैनिक पित्यासाठी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनीही प्रशासनाकडे विनंती केली. तोपर्यंत फलटणमध्ये सर्व हॉस्पिटल फिरून तरुण हतबल झाला होता. एका सैनिक पित्याला व त्याच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी कोणताही परिचय नसताना हा तरुण रात्री दीड वाजेपर्यंत फिरत होता. याचवेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना फोन करून बेड उपलब्ध करून देऊ रुग्णास घेऊन या असा फोन केला.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबीयांची जबाबदारी म्हणून काही व्यक्ती धडपडत होते. हे लक्षात आल्यावर उपविभागीय अधिकारी यांनी रात्री सुद्धा एका संदेशाची दखल घेत सैनिक पित्यासाठी बेड उपलब्ध करून दिला. यातून ‘तू सीमेवर लढ तुझ्या कुटुंबाची काळजी आम्ही घेतो’ असाच संदेश दिला. यामुळे सैनिकाला दहशतवाद्यांविरुद्ध लढण्यास आणखी बळ देईल.