सातारा : जिल्हा पोलिस दलात भरतीसाठी विविध चाचण्यांना मंगळवारपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी आठशे जणांना बोलाविण्यात आले होते. मात्र, ५९१ जणांनी हजेरी लावली. प्राथमिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या ४९१ जणांची सोळाशे मीटर धावण्याची चाचणी बुधवारी होणार आहे. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची चांगली सोय पोलिस खात्याने केली होती. अगदी उमेदवारांची कपडे सांभाळण्यासाठी हवालदारही नेमला होता.पोलिस भरतीमुळे जुने आरटीओ कार्यालय ते पारंगे चौक रस्त्यावर पहाटेपासूनच उमेदवार आणि पालकांची गर्दी उसळली होती. हा रस्ता काही तासांसाठी बंद करण्यात आला होता. बाहेरगावाहून आलेले उमेदवार कागदपत्रे घेऊन उभे होते. कागदपत्र पडताळणीनंतर शारीरिक चाचण्या सुरू झाल्या. कागदपत्र पडताळणीत ४७ तर शारीरिक मोजमापांमध्ये ५३ असे शंभर उमेदवार अपात्र ठरले. शारीरिक मोजमापात छाती (न फुगवता आणि फुगवून), उंची आणि वजनाचे मोजमाप घेतले. पहिल्या दोन फेऱ्यांमधून पात्र ठरलेल्या ४९१ उमेदवारांची शंभर मीटर धावणे, लांब उडी, पुल-अप्स आणि गोळाफेक अशा चार चाचण्या घेण्यात आल्या. आता त्यांची सोळाशे मीटर धावण्याची चाचणी बाकी असून, ती बुधवारी पहाटे सोनगाव फाटा ते शेंद्रे फाटा या रस्त्यावर घेण्यात येणार आहे. दुपारपर्यंत हा रस्ता सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला असून, बोगद्याकडून शेंद्रे फाट्याकडे जाणारी वाहतूक सोनगाव फाट्यावरून सातारा पॉलिटेक्निक कॉलेजमार्गे हायवेकडे वळविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)भूलथापांना बळी पडू नकापोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी भरती प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. पारदर्शकता राहावी यासाठी संपूर्ण भरतीप्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. तथापि, भरतीविषयी शंका असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उमेदवारांनी कोणत्याही भूलथापांना किंवा आमिषांना बळी पडू नका असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. आज ८०० उमेदवारबुधवारी (दि. ३०) ८०० उमेदवारांना भरतीसाठी बोलाविण्यात आले आहे. त्यांना कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि इतर मैदानी चाचण्यांमधून पात्र ठरावे लागेल. नंतर त्यांची सोळाशे मीटर धावण्याची स्पर्धा होईल. अशा क्रमाने ही भरती प्रक्रिया दि. ५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
तुम लडो... हम कपडे संभालते हैं !
By admin | Published: March 29, 2016 10:06 PM