सातारा : ‘सातारा आदर्श नगरपालिका व्हायला हवी, हीच आमची अपेक्षा आहे. आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या, मी तयार आहे,’ असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता दिले.
सातारा पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत जिल्हा परिषदेसमोरील कॅम्प सदरबझार येथे उभी राहात आहे. या इमारतीचे भूमिपूजन खासदार उदयनराजे यांच्याहस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक किशोर शिंदे, वसंत लेवे, राजू भोसले, निशांत पाटील, श्रीकांत आंबेकर, सुहास राजेशिर्के, सुनील काटकर, माजी नगराध्यक्षा रंजना रावत आदी उपस्थित होते.
खा. उदयनराजे म्हणाले, ‘कोण काय म्हणतंय याच्याशी मला काहीच घेणं नाही. सातारकरांच्या पाठबळावर मी ठाम असून, भविष्यातही मी आपल्या सेवेत रुजू आहे. सातारकर माझं हृदय आहे. त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आजवर जर मी काही कमावलं असेल तर ते पैसे नाही, तर तुमचं प्रेम आहे. ते मी गमावणार नाही. टीका करणारे करतील; पण जे काम करतात तेच नारळ फोडतात. चर्चेला याल तर धाडस ठेवा, असे आव्हान त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.
या कार्यक्रमादरम्यान चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा लाभलेल्या नूतन प्रशासकीय कामाचा प्रारंभ म्हणून उदयनराजे यांनी पहिली कुदळ मारली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निशांत पाटील यांनी नूतन इमारतीच्या जागा हस्तांतरणाचा प्रवास कथन केला, तर वास्तुविशारद सुहास तळेकर यांनी नूतन इमारतीचे तांत्रिक विश्लेषण केले . शिरिष चिटणीस यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कोण काय म्हणाले...
निशांत पाटील : पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत रोलमॉडेल असणार आहे. सातारा विकास आघाडीचा पुढचा नगराध्यक्ष याच इमारतीमधून आपले कामकाज सुरू करेल, यात कोणतीही शंका नाही.
दत्ता बनकर : पालिकेला केवळ एक रुपया नाममात्र किमतीत ही जागा मिळाली. नुकतीच इमारतीला २० कोटींची प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. आघाडीने आजवर केलेली कामे जनतेने पाहिली आहेत. नारळफोड्या गॅंग काय करू शकते, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. चांगल्या कामांना विरोध करू नये.
अशी असणार इमारत
पालिकेची नूतन प्रशासकीय इमारत ही ४० गुंठे क्षेत्रात उभी राहणार आहे. एकूण नऊमजली इमारतीत पहिले तीन मजले हे पार्किंगसाठी असणार आहेत, तर सहा मजल्यांवर प्रशासकीय कामकाज चालणार आहे. इमारतीत प्रवेश करताच समोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जाणार आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांची दालने, कमिटी हॉल, सभागृह, लिफ्ट अशा सुविधा या इमारतीत असणार आहेत, अशी माहिती वास्तुविशारद सुहास तळेकर यांनी दिली.