म्हसवड : अरुणाचल प्रदेशातील चांगलांग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवरील मॅनमाऊ गावात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात हुतात्मा झालेले जवान दत्तात्रय माधव सत्रे यांच्यावर आज (मंगळवार) सत्रेवाडीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.सत्रेवाडीचे सुपुत्र दत्तात्रय सत्रे हे २००३ मध्ये सैन्यात दाखल झाले. ते ‘नऊ आसाम रायफल्स’मध्ये कार्यरत होते. दत्तात्रय सत्रे हे शुक्रवार, दि. ६ रोजी दुपारी अकराच्या सुमारास वाहनातून चांगलांग जिल्ह्यातील मॅनमाऊ गावात गस्त घालण्यासाठी निघाले होते. त्यावेळी बोडो अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाचा स्फोट होऊन दोन स्थानिक नागरिकांसह सर्व जवान गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दत्तात्रय सत्रे यांचे उपचारापूर्वीच निधन झाले.या स्फोटाची जबाबदारी नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलॅण्ड, नॅशनलिस्ट असोसिएशन कौन्सिल आॅफ नागालॅण्ड, मणिपूर पीपल्स लिबरेशन फ्रंट या चार संघटनांनी घेतली आहे, अशी माहिती आसाम रायफल्सचे लेफ्टनंट कर्नल एस. न्यूटन यांनी दिली आहे.हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांचे पार्थिव मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दहिवडी येथे आणण्यात आले. तेथून मलवडीच्या प्रवेशद्वारापासून फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून अंत्ययात्रेस सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. ठिकठिकाणी ग्रामस्थ अंत्यदर्शन घेत होते. अंत्ययात्रा दत्तात्रय सत्रे यांच्या घरासमोर आली असता पार्थिव काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवले. त्यानंतर घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात चौथऱ्यावर पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी १०९ मराठा लाईफ इलफन्ट्री बटालियन आणि सातारा पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आमदार जयकुमार गोरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार महेश पाटील, गटविकास अधिकारी सीमा जगताप, संजय भोसले, धीरज दवे, विजय साखरे, दादा काळे, अर्जुन काळे, तानाजी मगर, अॅड. भास्करराव गुंडगे, पोलीस उपनिरीक्षक पी. एन. इंगळे आदींनी पुष्पचक्र अर्पण करुन अंत्यदर्शन घेतले. सत्रे यांच्या हौतात्म्याबद्दल गावात हळहळ व्यक्त होत होती. (प्रतिनिधी)चार दिवसांनी अश्रूंचा बांध फुटलाअंत्ययात्रा दत्तात्रय सत्रे यांच्या घरासमोर आली असता हुतात्मा दत्तात्रय सत्रे यांची आई, पत्नी, भाऊ, बहीण व मुलांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. चार दिवसांपासून रोखून धरलेल्या अश्रूंचा बांध अखेर फुटला.
जवान दत्तात्रय सत्रे अनंतात विलीन
By admin | Published: February 10, 2015 10:16 PM